माय अहमदनगर वेब टीम
बीड - लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असून भाजप आणि कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर देखील केली. मात्र, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार कधी जाहीर होतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशातच भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सूचक विधान केलं. तसेच आपल्याला माजी कोणी-कोणी केलं, यावर बोलायलाच नको, असं म्हणत त्यांनी थेट नाव घेणं टाळलं.
पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यातील शिरूरमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “मी देखील माजी पालकमंत्री आहे. त्यावर माजी ग्रामविकास मंत्री आहे. येथे बसलेले सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे हे आज सत्ताधारी आहेत. मला कोणी-कोणी माजी केलं, हे मी बोलू शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. मंचावर बसलेले नेते आज सत्ताधारी असले तरी मी मात्र माजी झाले. त्यामुळे मला तुम्हाला (जनतेला) काही थेट सांगता येईना.”
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘आजी’-‘माजी’ आमदारांना माझी काळजी घ्या, असा सल्लाही दिला. “सर्व ‘आजी’ लोकांनी ‘माजी’ लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमच्या ‘आजी’ होण्यामध्ये माझा थोडा तरी खारीचा वाटा आहे. पण आता चार दिवसांत आचारसहिंता लागेल, त्यामुळे आता काय काळजी घ्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी लोकसभेची घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ”, असं विधान करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे त्या लोकसभेच्या रिंगणात उरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबद्दल भाजपाकडून अद्याप थेट प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.