माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - लोकनेत्याला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायचे असते पण मी मागतोय. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, दिल्ली तख्खाला घाम फोडणारा असेल असा आमच्या खांद्याला खांदा लावणारा खासदार संसदेत पाठवा. जबाबदारी तुमची सर्वांची आहे. लोकनेते नीलेश लंके यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आई जगदंबेकडे हिच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी अहमदनगरमधून वाजावी अशी अपेक्षा करीत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आ. नीलेश लंके यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले.
नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या शेवटच्या प्रयोगानंतर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मा. आ. राहुल जगताप, रावसाहेब खेवरे, शशिकांत गाडे शशिकला अनिल राठोड, शरद झोडगे, राजेंद्र पिपाडा, डॉ. सुधा कांकरिया, संदेश कार्ले, नितीन धांडे, राणा प्रताप पालवे, विक्रम राठोड, माजी महापौर सुरेखा कदम, अशोक कानडे, अंबादास शिंदे, बाबासाहेब भिटे, वैशाली टेके, राजू शेटे, बाळासाहेब हराळ, गिरष जाधव, दिलीप झिंजुर्डे, राजेंद्र भगत, विजय पठारे, सिताराम काकडे, मच्छिंद्र सोनवणे, धनराज गाडे, नितीन बाफना, सुधाकर मुसमाडे, रामदास बाचकर, किरण कडू यांच्यासह लाखोेंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. महानाट्यादरम्यान प्रियांका शेळके पाटील यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली.
आ. नीलेश लंके यांच्या सामाजिक कार्याचा मला कायम अभिमान वाटत असल्याचे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले, कुठलीही राजकिय पार्श्वभुमी नसताना जेंव्हा सर्वसामान्य कुटूंबातील माणसं जनतेच्या काळजावर आपले अधिराज्य गाजवतात त्याचा अभिमान प्रत्येकाला वाटतो. या महानाटयास लाखोंच्या संख्येने उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल नगरकरांप्रती कोल्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लाखोंच्या संख्येने दररोज प्रेक्षक असताना ज्या पध्दतीने आ. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जे नियोजन केले ते खरोखर वाखाणण्यासारखं होतं असे सांगत कोल्हे यांनी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या सदस्यांचे कौतुक केले.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, माझ्या शिरूर मतदार संघात विरोधक मला घेण्यासाठी येत असताना तुम्ही नगरमध्ये येऊन महानाटयाचे प्रयोग का करता असे पत्रकारांनी मला विचारले असता पद, राजकारण सगळे बाजूला. छत्रपती सर्वोच्च आहेत आणि त्यांचा इतिहास प्रत्येक नागरीकापर्यंत पोहचला पाहिजे. छत्रपतींचा केवळ जयजयकार करून चालणार नाही तर छत्रपतींचा धगधगता इतिहास जो तुम्ही अनुभवला तो इतिहास काय प्रेरणा देतो ? या धगधगत्या इतिहासाने हीच प्रेरणा दिली की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्खासमोर झुकत नाही, झुकणार नाही असे कोल्हे यांनी सांगितले.
संसदेत डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचेत
गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने जे राजकीय चित्र पहतो आहोत. कांद्यावर निर्यात बंदी आली, सोयाबिनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले. महाराष्ट्रातून ४८ खासदार लोकसभेत निवडूण जातात. त्यातील सत्ताधारी व त्यांच्या मित्र पक्षांचे ३९ खासदार तोंड मिटून, मुग गिळून गप्प बसतात. आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुणी भांडत नाही. तरूणांच्या नशिबातील रोजगार हिरावले जातात. रोज एक उद्योग महाराष्ट्रातून पळविला जातो, कोणीही बोलत नाही. महापुरूषांचा अवमान मागच्या काळात करण्यात आला, कोणीही बोलले नाही. तर मग प्रश्न पडतो की येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबूगुबू वाजल्यानंतर माना हालविणारे नंदीबैल पाठवायचेत की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचेत.
- खा. डॉ. अमोल कोल्हे
आ. लंके यांनी साकारली भूमिका
महानाटयाच्या शेवटच्या दिवशी आ. नीलेश लंके यांनीही भूमिका साकारली केली. महानाटयातील राज्याभिषेक सोहळयाच्या प्रसंगात छत्रपती संभाजींसोबत सरदारांच्या भूमिकेत आ. नीलेश लंके झळकले. सरदाराचा पोषाख परिधान केलेल्या आ. लंके यांच्या हातात तलवारही होती.
Post a Comment