माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीएएची अधिसूचना जारी केली असून देशात सीएए लागू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारकडून घेण्यात आलेला हा मोठा निर्णय असल्याचे मानले जात आहे.
या कायद्यामुळे भारताच्या शेजारी असलेल्या ३ देशातील अल्पसंख्यांक नागरिकांना देशातील नागरिकता मिळेल. यासाठी त्यांना केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करावा लागेल.
भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सीएएचा जाहीरनाम्यात समावेश केला होता. पक्षाने हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित देखील केला होता. गेल्या काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक भाषणात सीएए लागू करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे केंद्र सरकार निवडणुकीच्या आधी याची अधिसूचना जारी करेल अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्राने याची अधिसूचना जारी केली आहे.
सीएए कायदा लागू होणार याची चर्चा आज दुपारपासून सुरू होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी साडेपाच वाजता देशाला उद्देशून भाषण करतील अशी बातमी समोर आली. पण मोदींनी ५.३० वाजता मिशन दिव्यास्त्रसाठी डीआरडीओचे अभिनंदन करणारे ट्विट केले. त्याच बरोबर ते देशाला संबोधित करणार नाहीत अशी माहिती दिली गेली.
सीएए आज रात्री उशिरा लागू गेले जाईल अशी देखील चर्चा होती. पण मोदींचे संबोधन होणार नाही याची माहिती आल्यानंतर काही मिनिटातच केंद्रीय गृहमंत्रालयाने सीएएचे नोटिफिकेशन जारी केल्याची माहिती दिली. सीएए कायदा २०१९ साली संसदेत मंजूर करण्यात आला आहे.
CAAमुळे मुस्लिम धर्माव्यतिरिक्त भारताच्या शेजारी असलेले ३ मुस्लिम देशातून देणाऱ्या अन्य धर्मातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. यासाठी केंद्र सरकारने एक वेब पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल नोटिशिकेशननंतर लॉन्च केले जाईल. यात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ३ देशातील नागरिकांचा समावेश असेल. वेब पोर्टवर नोंदणी केल्यानंतर आणि सरकारकडून तपासणी प्रक्रिया पार पाडल्यानंतर संबंधित व्यक्तीला भारताचे नागरिकत्व मिळेल. वरील ३ देशातून आलेल्या व्यक्तीला अल्पसंख्यांक असल्याचे कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ३ देशातील सहा अल्पसंख्यांक हिंदू, शिख, जैन, बैद्ध,पारसी आणि ख्रिश्चन या धर्मातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याची तरदूत CAA कायद्यात केली आहे.
Post a Comment