माय अहमदनगर वेब टीम
बीड : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील सर्वच पक्षांची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे. भाजपाने दुसरी यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश केला होता. यात बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. यानंतर पंकजा मुंडे यांनी मतदारसंघाचा दौरा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बीड मतदारसंघात मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचे समजते. पंकजा मुंडे यांच्या विरोधात ते महिला उमेदवार संधी देतात का? हे पाहावे लागेल.
पंकडा मुंडे यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली होती. अशातच आता पंकजा मुंडे यांच्याविरोधात बीडमधील भाजपाचे दिवंगत नेते, आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव उमेदवारीसाठी समोर आले आहे. भाजपाने दुसरी यादी जाहीर केल्यानंतर विनायक मेटे यांच्या समर्थकांकडून एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विनायक मेटे यांना भाजपाने जरी आमदारकी दिली असली तरी त्यांना सतत डावलण्याचे कामही भाजपानेच केल्याचा आरोपही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून निवडणूक लढवावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शरद पवार मास्टरस्ट्रोक खेळणार?
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे भाऊ आणि त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धनंजय मुंडे शरद पवार यांच्या निशाणावर आहेत. त्यामुळे बीडमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार गट आग्रही आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात बीडची जागा मागितली आहे. तसेच दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे आता शरद पवार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन मास्टरस्ट्रोक खेळणार का? हे पाहावे लागेल.
दरम्यान, दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सहभाग घेतला होता. यानंतर त्यांनी 1995 मध्ये त्यांनी तत्कालीन भाजपा शिवसेना युतीला पाठींबा दिला. युती सरकार आल्यावर मेटे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले, पण पुढे युतीसोबत वाद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतर्फे 2 वेळा त्यांना आमदारकी मिळाली. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुक दरम्यान मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीत प्रवेश केला. याच काळात त्यांनी बीडमधून विधानसभाही लढविली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2016 मध्ये त्यांना भाजपाने विधानपरिषदेत पाठविले. याच काळात त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रश्नावरून त्यांनी सभागृहात अक्षरश: रान पेटवले होते. दरम्यान, 2022 मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
Post a Comment