माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : यशवंत माध्यमिक विद्यालय आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये प्रदूषणमुक्त होळी साजरी करून एक नवीन आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. पदमश्री डॉ.पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक रंगांची व निसर्गाचा एक चांगला संदेश देणारी होळी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनवून नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केली होती. यावेळी निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही,अशी प्रतिज्ञा केली़. विद्यार्थ्यांना ऋतुमानाबद्दल व होळीच्या सणाबद्दल मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
सण-उत्सवाचे निमित्ताने निसर्ग व निसर्गातील विविध घटक म्हणजे पाणी, फुले, पाने, पशू, पक्षी, नदी, समुद्र आदींचे पूजन व संरक्षण करून होळी सण साजरी करण्याचे आवाहन जेष्ठ शिक्षक दिपक ठाणगे यांनी केले. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला़. होळी रे होळी पुरणाची पोळी , होली है - होली है असा जयघोष विद्यार्थ्यांनी यावेळी केला. सदरच्या कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, एस.टी पादीर, रो.ना पादीर, सहदेव पवार, रामभाऊ चत्तर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Post a Comment