माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - बुरुडगाव येथील कचरा डेपोतील अनागोंदी कारभार व कचरा विलगी करणासाठीची मशीनरी चार वर्षांपासून उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सहा स्वच्छता निरीक्षकांनी दिलेले खुलासे अमान्य करत त्यांच्यावर गैरव्यवहार, अनियमीतता व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
डेपोतील १०० टन क्षमतेच्या खतनिर्मिती प्रकल्पात तीन प्रकारच्या कचरा विलगीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनरी नसल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत ही विलगीकरण होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर प्रशासक जावळे यांच्या आदेशानुसार विभाग प्रमुख सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांनी सहा स्वच्छता निरीक्षकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यात आलेले खुलासे असमाधानकारक असल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार किशोर देशमुख, परिक्षित बिडकर, प्रशांत रामदिन, अविनाश हंस, बाळू विधाते, राजेश तावरे यांच्यावर गैरव्यवहार, अनियमीतता व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रभारी उपायुक्त सपना वसावा यांची चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी म्हणून मेहेर लहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Post a Comment