माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ‘तुला येथे धंदा करून देणार नाही, येथे माझी दादागिरी चालते’ असे म्हणून सहा जणांच्या टोळक्याने व्यापार्याला मारहाण केली. दुकानातील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले असल्याची घटना हातमपुराच्या धरती चौकातील वर्धमान ट्रेडर्स दुकानात घडली. अशोक प्रेमराज चंगेडे (रा. हातमपुरा) असे मारहाण झालेल्या व्यापार्याचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा मुलगा अजय अशोक चंगेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुंदर देठे (रा. धरती चौक, नगर), पियुष शाम साठे, खुर्क्या ऊर्फ आकाश राम कोरे, चंद्रकांत उजागरे (पूर्ण नाव माहिती नाही), अक्षय ऊर्फ स्वप्नील राजेंद्र शिंदे, योगेश राजेंद्र कसबे (सर्व रा. कोठी, स्टेशन रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिर्यादी यांचे वर्धमान ट्रेडर्स होलसेल टायर्स नावाचे दुकान धरती चौक, हातमपुरा येथे आहे. बुधवारी (दि. 20) दुपारी फिर्यादीचे वडिल अशोक चंगेडे दुकानावर होते. त्यावेळी तुषार देठे व इतर पाच जण तेथे आले. त्यांनी अशोक यांना लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली. चंद्रकांत उजागरे याने ‘तुला येथे धंदा करून देणार नाही, येथे माझी दादागिरी चालते’ अशी धमकी दिली. शिवीगाळ, दमदाटी करून दुकानातील वस्तूंचे तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान अशोक यांनी मुलगा अजय यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अजय यांनी दुकानात धाव घेत सीसीटीव्हीची तपासणी केली असता सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अजय यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Post a Comment