७० वी राष्ट्रीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धा :
हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांच्या आजच्या विजयाने बाद फेरीतील प्रवेश निश्चित
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर :- हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशने ७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत साखळीत सलग दुसरा विजय मिळवित बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला. आज दुसऱ्या दिवशी देखील सामन्यांना ठीक ५-००वाजता सुरुवात झाली. अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुलात मॅट वर झालेल्या ड गटात हिमाचल प्रदेशने कडव्या लढती नंतर उत्तराखंडला ४९-३६ असे नमविले.
मध्यांतराला २५-१९अशी आघाडी घेणाऱ्या हिमाचलला नंतर मात्र उत्तराखंडला विजयाकरीता चांगलेच झुंजविले. शेवटची सात आठ मिनिटे असताना अवध्या ३ गुणांची आघाडी हिमाचालकडे होती. हिमाचालचा फक्त प्रवीण ठाकूर हा खेळाडू मैदानात शिल्लक होता. त्याने आपल्या चढाईत बोनस गुणासह २गडी टिपत होणारा लोण वाचविला. त्यानंतर उत्तराखंड वर लोण देत आपला विजय निश्र्चित केला. केशव कुमार, पप्पू यांच्या संयमी चढाया व प्रीत सिंग यांचा बचाव यामुळे हिमाचलला हे शक्य झाले. उत्तराखंड कडून प्रतीक दहिया, अमन चौहान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले.
राजस्थानने ई गटात पाँडिचेरी वर ५८-२८ अशी मात करीत या गटात सलग दुसरा विजय मिळविला. विश्रांतीला २९-१४ अशी आघाडी घेणाऱ्या राजस्थानने नंतर देखील तोच जोश कायम राखत आपला विजय सोपा केला. जय भगवान, राहुल चौधरी यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. पाँडिचेरी कडून मोहनदास, विघ्नेश यांनी बऱ्यापैकी लढत दिली. हिमाचल प्रदेशने ग गटात विदर्भाचा ४४-३० असा पराभव केला. पहिल्या डावात २५-१७ अशी आघाडी घेणाऱ्या उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत आपला विजय निश्र्चित केला. राहुल चौधरी उत्तर प्रदेश कडून, तर आकाश पिकलमुंडे विदर्भ कडून उत्तम खेळले. याच गटात केरळ ने जम्मू काश्मीरला ३९-३० असे पराभूत केले.
सेनादलने ह गटात आंध्र वर ५६-२० अशी सहज मात केली. पहिल्या डावात ३ लोण देत ३७-११ अशी आघाडी घेणाऱ्या सेनादलाने दुसऱ्या डावात देखील आक्रमक खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. भारत, मनजीत, लकी शर्मा यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. आंध्रचा चेका नागाबाबु चमकला. याच गटात पंजाबने ओरिसाला ३७-२४ असे नमविले. कर्नाटकने विश्वास, गंगा गोधर यांच्या चढाया त्याला प्रणवची मिळालेली पकडिची साथ यामुळे तेकांगणाला ४९-३२ असे पराभूत केले. दिल्लीने अ गटात गुजरातचा ४१-३७ असा पाडाव केला. पहिल्या सत्रात २३-२० अशी आघाडी राखणाऱ्या दिल्लीला दुसऱ्या सत्रात देखील गुजरातने विजयासाठी चांगलेच झुंजविले.
Post a Comment