माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गाडीत महिला असल्याने शिवीगाळ करू नका असे समजून सांगण्यासाठी गेलेल्या तरूणाला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून गाडीचे नुकसान केले. शिवाजी दत्ता मुळे (वय 32 रा. एकनाथनगर, केडगाव, मुळ रा. घोडेगाव ता. जामखेड) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजु आजबे, राजु कराळे, भाऊ कोतकर (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी (दि. 7) रात्री साडे अकराच्या सुमारास शिवाजी व त्यांची पत्नी त्यांच्या कारमधून केडगाव बायपास येथील हॉटेलमध्ये भाजी पार्सल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेले राजु आजबे, राजु कराळे व भाऊ कोतकर यांच्यात शिवीगाळ सुरू होती. तेव्हा शिवाजी त्यांना म्हणाले, ‘माझ्या गाडीत लेडीज आहे, तुम्ही शिवीगाळ करू नका’ असे म्हणताच त्या तिघांनी शिवाजी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. लाकडी दांडक्याने गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. गाडीच्या काचा फोडत असताना शिवाजी मध्ये गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर शिवाजी व त्यांच्या पत्नीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार गिरीषकुमार केदार अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment