माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून गावठी कट्टयासह ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वाटेफळ (ता. नगर) शिवारात हॉटेल निसर्ग येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
लोकसभा निवडणुकी अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, रविद्र कर्डीले, मयुर दिपक गायकवाड, विशाल आण्णासाहेब तनपुरे, संतोष खैरे यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
या पथकास अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाटेफळ शिवारातील हॉटेल निसर्ग या ठिकाणी एका इसमाकडे गावठी कट्टा आहे. ही माहिती मिळताच या पथकाने तातडीने तेथे धाव घेत शहाजी निवृत्ती जाधव (वय ३९, रा. राजेगांव, ता. केज, जि. बीड, हल्ली रा. हॉटेल निसर्ग, वाटेफळ, ता. नगर) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ १ गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. पथकाने ती जप्त करत त्याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Post a Comment