शेतकऱ्यांना दिलासा; 'ते' ९० कोटी जमा, अजून किती मिळणार पहा...



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - 

दुधाला कमी भाव मिळत असल्याने सरकारने पशु पालकांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते. ते दुधासाठी जाहीर केलेले अनुदान सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर राहिला असून, त्यापाठोपाठ नाशिक विभाग आहे.


राज्यात गाय दूध अतिरिक्त झाल्याने खरेदी दर घसरले होते. राज्यात ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘राजारामबापू’ वगळता ३.५ फॅट आणि ८.५ एस. एन. एफ.साठी प्रतिलिटर ३३ रुपये कोणीच देत नाही. खासगी दूध संघ तर २५ ते २८ रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डिसेंबरपासून गाय दूध दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीतील दूध खरेदीला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.


त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे. त्यापोटी १६५ कोटी रुपये मिळणार असून, त्यापैकी आतापर्यंत १८ कोटी १८ लाख १७ हजार ५ लिटर दुधाचे ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित अनुदान येत्या चार ते पाच दिवसात मिळणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post