शिंदे गटाच्या 'या' खासदारांना घरचा रस्ता; ठाकरे यांचे सूचक वक्तव्य...

 


माय नगर वेब टीम 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला अपेक्षित जागा मिळत नसल्याने खासदार यांच्यासह समर्थक नाराज आहेत. जागावाटपात भाजपचं वर्चस्व राहिलंय. त्यावरुन विरोधक अजितदादांसह शिंदेंना घेरत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळपास 5 जागांवर विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय. अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा पत्ता कट झाला. यवतमाळमधून खासदार भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही. रामटेकच्या कृपाल तुमानेंनाही पुन्हा संधी मिळाली नाही. मुंबईतून गजानन कीर्तीकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितलाय. आणि नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर शिंदेंनी आमदारांना जे सांगितलं होतं, त्याची आठवण करुन देत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केलीय.

दरम्यान, उमेदवार शिंदेंचे असूनही हेमंत गोडसे आणि भावना गवळींना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जावं लागलं. यावरुनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. ज्या हेमंत पाटलांच्या विजयाचा दावा शिवसेना संतोष बांगरांनी केला होता, तेच बांगर आता हेमंत पाटलांनीच बाबुराव कोहळीकर नाव सुचवल्याचं म्हणतायत. हेमंत पाटलांच्या प्रचारात हातवाऱ्यांनी वादात राहिलेले बांगर आता नवं गाणं म्हणत प्रचाराला लागले आहेत.


अजित पवार गटाच्या 4 जागा.....

सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीनं 2019 ला जिंकलेल्या चार जागा तर आपण लढणारच, त्याऐवजी इतर जागांवर अजित पवारांनी दावा सांगितला होता. तर मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदेंइतक्याच जागांची मागणी केली होती. या घडीपर्यंत अजितदादांच्या गटाला बारामती, रायगड, शिरुर आणि धाराशीव या चार जागा कन्फर्म झाल्या आहेत. याशिवाय सातारा आणि नाशिकची मागणी होतेय. पण कन्फर्म झालेल्या ४ जागांपैकी शिरुरमध्ये शिंदेंचे शिवाजी आढळरावांना राष्ट्रवादीत प्रवेश करुन तिकीट द्यावं लागलं. तर धाराशीवमध्ये भाजपच्या राणाजगजितसिंहाच्या पत्नींना प्रवेश देवून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.

कुठे समोरासमोर?

परभणीत गेल्यावेळी राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला होता. यावेळी अजित पवार गटात राहिलेल्या राजेश विटेकरांना तिकीटाची आशा होती. मात्र महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या जानकरांना ही जागा दिली गेली. अजित पवारांना ज्या शरद पवारांकडून राष्ट्रवादीची मालकी मिळवत घड्याळ चिन्ह मिळवलं ते लोकसभा निवडणुकीत तरी फक्त दोनच जागांवर आमने-सामने येणार आहेत. कारण शरद पवारांचे उमेदवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार यांच्यात फक्त दोनच ठिकाणी सामना होणार आहे. एक म्हणजे बारामती आणि दुसरं शिरुर.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post