माय अहमदनगर वेब टीम
बीड : बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. यात गारपीट, वादळी वाऱ्याने शेतकऱ्याचा आता कंबरडं मोडलं. हाता-तोंडाशी आलेलं ज्वारी, बाजरी यासह काढायला आलेले आंबे देखील जमीन दोस्त झाले आहेत. काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने दुपारनंतर अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. गाराही पडल्या. यात जोराचा वारा आणि विजांचा कडकडाट याने अनेक घरं उध्वस्त केली. अनेक जनावरांना इजाही झाली. यात लवकरात लवकर शेतकऱ्यांना आता मदतीची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई, धारूर, वडवणी, परळी यासह अनेक तालुक्यात गारपीट विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह अतोनात नुकसान झालं आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक जनावरांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. गेवराई तालुक्यातील शिरसमार्गे येथे वादळी वारा आणि गारांमुळे अनेक जनावरांना दुखापत झाली आहे. यात जनावरांच्या अंगावरील दुखापत पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्यात परळीत ज्वारी, बाजरी याचं अतोनात नुकसान झालं आहे, तर परळीसह जिल्ह्यात आंब्याचं हाताशी आलेलं पीक वादळी वाऱ्याने जमीन दोस्त केलं आहे.
बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. यात वादळी वाऱ्याने पाऊस कमी, गारा जास्त आणि नुकसान हे अतोनात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून आता तात्काळ मदतीची मागणी होत आहे. या घटनेनंतर कृषिमंत्र्यांना माध्यमाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देत सांगितलं, की बीड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं आहे. आंबा फळबागं यात उध्वस्त झाली आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पुनर्वसन विभागाकडे तात्काळ पंचनामे करत या सर्व गोष्टी शासन दरबारी पाठवण्यात येणार आहेत.
मदत आणि पुनर्वसन विभागाकडे सध्या आचारसंहिता लागू असल्याने मदत जाहीर करण्यास अडचणींचा सामना करावा लागतोय, मात्र तरी देखील शासन प्रशासनाकडून मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांकडे आम्ही पूर्ण लक्ष देणार असल्याची माहिती देखील कृषिमंत्र्यांनी दिली. हातात तोंडाशी आलेलं अनेक हेक्टर पीक मातीमोल झाल्याने आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरात लवकर शासन, प्रशासन स्तरावर हालचाली होण्याची गरज आहे.
Post a Comment