माय अहमदनगर वेब टीम
जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पवार गटात खळबळ उडालेली असतांनाच आता रावेर मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षावर दबाव येत आहे. त्यामुळे आता उमेदवार निश्चितीसाठी उद्या सोमवारी पुणे येथील ‘मोदी बागेत’ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
सोमवारी होणाऱ्या या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, राजीव देशमुख, संतोष चौधरी, श्रीराम पाटील, वाल्मिक पाटील, विकास पवार यांच्यासह इतर नेते व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. सोमवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत उमेदवाराचे नाव निश्चित होऊ शकते. मात्र, उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा ही ९ एप्रिल रोजी होईल अशी माहिती आहे.
नाथाभाऊंचा भाजपत जाण्याचा निर्णय, रोहिणीताई राष्ट्रवादीतच, कार्यकर्त्यांकडून आक्षेपाची शक्यता
एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटातच थांबणार आहेत. या निर्णयावर शरद पवार गटाच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
पवार गटाकडून नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्यामुळे रावेर मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा करण्यास विलंब होत आहे. रावेर मतदारसंघातून इच्छुक असलेल्या संतोष चौधरी, अॅड. रवींद्र पाटील, श्रीराम पाटील यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्याने शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा मीदेखील ऐकली आहे. मात्र, याबाबत मला काहीही माहीत नाही. उमेदवाराची घोषणा प्रदेशाध्यक्षांकडून होईल.
- अॅड. रवींद्र पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट
)
Post a Comment