आता दिल्लीत पोहोचल्याशिवाय थांबणार नाही!, 'त्यांनी' साखर, डाळ माझ्यामुळे वाटली, कोण काय म्हणाले पहा...

 


नगर दक्षिणचा निकाल आजच लागला !  / नीलेश लंके यांच्या विजयाचा जयंत पाटील यांना विश्‍वास / स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गड येथे शुभारंभ 

माय अहमदनगर वेब टीम 

पाथर्डी - आज मोहटादेवीचे दर्शन घेऊन आपण या यात्रेस सुरूवात केली असून आता ही स्वारी दिल्लीत पोहचल्याशिवाय थांबणार नाही. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून आपला विजय निश्‍चित आहे. किमान दोन लाखांच्या मताधिक्याने आपण विजयी होणार असल्याचा विश्वास आ.लंके यांनी व्यक्त केला. निवडणूक आल्यामुळे पाच वर्षानंतर जनतेपुढे जाऊन विरोधकांवर साखर, डाळ वाटण्याची वेळ आली. आपण आव्हान उभे केल्यामुळेच त्यांना हे करावे लागल्यामुळे त्याचे श्रेय मलाच असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. 



लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास अद्याप अवधी असतानाही कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह पाहता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल आजच लागला असून दक्षिेणेचा गड नीलेश लंके हेच सर करतील असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

       नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोहटादेवी गड येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.खा.संजय राऊत पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी फोनवरून उपस्थितांना संबोधित केले. 

आ.पाटील म्हणाले, जनसामान्यांनी खांद्यावर घेतलेले नीलेश लंके यांच्यासारख्या नेतृत्वाला कोणीही थोपवू शकत नाही. सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे हे नेतृत्व असून सेवा करण्याचा त्यांचा पिंड आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श लंके यांनी घालून दिला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली रूग्णांची सेवा देशालाच नव्हे तर जगालाही भावल्याचे गौरवोद्गार पाटील यांनी काढले. 

 या मतदारसंघातील अनेक प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, महिला, व्यापारी, विविध जाती धर्माच्या आरक्षणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नीलेश लंके दिल्लीत आवाज उठवतील. जो आवाज मागच्या पाच वर्षात उठला नाही. त्यामुळे लंके यांच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस उभा असल्याचे पाटील म्हणाले. 

  


 यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, आ. लहू कानडे, पक्ष निरक्षक अंकुश काकडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष  राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव  प्रताप ढाकणे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,   काँग्रेस जिल्हाध्यक्ष  जयंत वाघ,  किरण काळे, संदेश कार्ले, रफिक शेख, शिवशंकर राजळे, हरिष भारदे, मा. आ. साहेबराव दरेकर, वजीर पठाण, बंडू बोरुडे, अभिषेक कळमकर, योगिता राजळे, बाळासाहेब हराळ, सीताराम बोरुडे, गहिनीनाथ शिरसाठ, राहुल मगरे, बाळासाहेब डाके, अर्जुन घायताकड,राजेंद्र दौंड, संपत मगर, किसन आव्हाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


आचार विचार महत्वाचे 

विकास कामांच्या नावाखाली भाजपासोबत गेलेल्या अजित पवार व इतर नेत्यांचाही पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. विकास कामांच्या नावाखाली लाचारी पत्करणे योग्य नाही. विकासासाठी गेलात परंतू कोणत्या विचारसरणीसोबत आपण काम करतो आहोत. याला महत्व आहे. राजकारणात आचार, विचार महत्वाचे असल्याचे सांगताना शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे. महाविकास आघाडीच महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकेल असा विश्‍वास जनतेमध्ये असल्याचे पाटील म्हणाले.आमच्यातून गेलेल्या सरदारांना दिल्ली दरबारात सहाव्या रांगेत उभे रहावे लागत असल्याचा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला.


कधी काळी लंके शिवसेनेचेच !

हुकूमशाही, संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही नीलेश लंके यांच्यासोबत आहोत. कधी काळी नीलेश लंके हे शिवसेनेचेच होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना कायम आशिर्वादच दिलेले आहेत. आजच्या या शुभारंभासाठी इच्छा असूनही येता आले नाही. या यात्रेच्या सांगतेसाठी आदित्य ठाकरे यांनी येण्याचे मान्य केले आहे. यात्रेदरम्यान आपणही हजेरी लावू. 

खा. संजय राऊत


आम्हीही हट्टी !

नगर -पाथर्डी रस्त्याच्या कामासाठी आपण उपोषण केले. सत्तेचा गैरवापर करून उपोषणस्थळी येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. मात्र आम्हीही हट्टी आहोत. जे ठरविले तेच करतो.  काम सुरू झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर काम सुरू झाले. मात्र त्याचेही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात  आल्याचे लंके म्हणाले.


उतरती कळा लागली !

आम्ही दरवर्षी मोहटादेवी यात्रेचे आयोजन करतो. निवडणूका आल्या म्हणून खासदारही हेलिकॉप्टरने गडाकडे आले. गडावर पुष्पवृष्टी करून परतले. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर उलटे फिरल्याने त्यांना आता उतरती कळा लागलेली आहे. कारण देवीला ते मान्य नव्हते. चार पावले अनवाणी पावलाने गेेले असते तर देवीने आशिर्वाद दिले असते. मात्र दादांनी जहागिरी दाखविल्याची टीका लंके यांनी केली. 


जिकडे कर्डीले, तिकडे पराभव !

कोठेही जा, १० लोकांपैकी ९ लोक लंके यांना पसंती देत आहेत. माजी आमदार शिवाजी कर्डीले हे ज्यांच्यासोबत असतात तो उमेदवार पराभूत होतो हा इतिहास आहे. त्यामुळे नीलेश लंके यांचा विजय निश्‍चित आहे. आगामी विधानसभेलाही आम्ही शिवाजी कर्डीले यांना आमदार होऊ देणार नाही.

प्रा.शशिकांत गाडे -जिल्हाप्रमुख, शिवसेना 


तर पुढची पिढी तुम्हाला षंढ म्हणेल 

नीलेश लंके हे तुमचं आमचं पोरगं खासदार होणार आहे. तुम्ही शहाणे व्हा. दगा फटका झाला तर पुढची पिढी आपणास षंढ म्हणेल. माझा लहान भाऊ खासदार होणे ही त्याची नाही तर आपली गरज आहे. आपण लंके यांना हात धरून बसवू शकतो. इतर लोकप्रतिनिधी फोनही घेत नाहीत मग मोठेपणा मिळविण्यासाठीच यांना खासदारकी पाहिजे का ? 

प्रताप ढाकणे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी 

वाघ आलाय, बिबटे पळून जातील !

कांदा, दुधाच्या दराबाबात खा. सुजय विखे यांनी संसदेत आवाज का उठविला नाही ? राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघ आपले होमग्राउंड आहे अशा वल्गना करणारांची ही जहागीरी नाही. या मतदारसंघात तुतारीच वाजणार आहे. आता वाघ आलाय, बिबटे पळून जातील !

प्राजक्त तनपुरे -आमदार 

महिला विक्रेत्यांची मदत !

मोहटादेवी गडावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या महिलांनी नीलेश लंके आमचा भाऊ आहे अशी भूमिका घेत १ लाख ५० हजार रूपयांची मदत आ. लंके यांच्या निवडणूकीसाठी दिली. लंके यांचे औक्षण करीत जयंत पाटील यांच्या हस्ते ही मदत लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post