माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: आयपीएल २०२४मध्ये सोमवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ६ विकेटनी विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला राजस्थानच्या गोलंदाजांनी फक्त १२५ धावांवर रोखले आणि त्यानंतर विजयाचे लक्ष्य फक्त १५.४ षटकात आणि ४ विकेटच्या बदल्यात पार केले. राजस्थानकडून रियान परागने ३९ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी केली. राजस्थानचा हा सलग तिसरा विजय ठरला तर मुंबईचा सलग तिसरा पराभव होय.
या विजयानंतर राजस्थानच्या संघाला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. सलग ३ विजयानंतर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ ६ गुणा आणि प्लस १.२४९च्या नेटरनरेटसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचला आहे.
गुणतक्त्यात मुंबई इंडियन्स सलग ३ पराभवासह अखेरच्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर केकेआर असून त्यांनी २ पैकी २ लढती जिंकल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्ज असून त्यांनी ३ पैकी २ लढती जिंकल्या आहेत. गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्स असून त्यांनी ३ पैकी २ लढती जिंकल्या आहेत.
३ पैकी १ विजय आणि दोन पराभवासह सनरायझर्स हैदराबादचा संघ २ गुणांसह पाचव्या, तर २ पैकी १ विजय आणि १ पराभवासह लखनौ सुपर जायट्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी प्रत्येकी ३ लढतीत एक विजय मिळवला आहे. ते गुणतक्त्यात अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ तळातून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायटस् संघात लढत होणार आहे. या दोन्ही संघांना उद्याच्या लढतीत विजय मिळवून गुणतक्त्यात वर जाण्याची संधी असेल.
Post a Comment