माय अहमदनगर वेब टीम
सातारा : आज शशिकांत शिंदे यांना महाआघाडीतून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदे यांची उमेदवारी आव्हानात्मक वाटते का, असे विचारले असता, "कधी कोणीही ओव्हरकॉन्फिडन्समध्ये राहू नये. आमची तर तयारी झाली आहेच. त्यांनी त्यांची करावी. लोकांच्या मनात जे आहे ते लोक ठरवतील. शेवटी लोकशाहीत मतदारच राजा आहे. एखाद्याच्या भविष्याविषयी बोलणं सोपं असतं. नावे ठेवणे सोपं असतं. ते मी कधी केले नाही," असे मत उदयनराजे यांनी शिंदे यांच्या उमेदवारीबाबत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. आज ते कराडमध्ये असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेस भाजपचे नेते अतुल भोसले, विक्रम पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तुम्ही राज्यसभेचे खासदार म्हणून की सातारा लोकसभेचे उमेदवार म्हणून पत्रकार परिषद घेताय यावर उदयनराजे म्हणाले, मी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्याशी बोलतोय आणि भाजप निश्चित निर्णय घेईल आणि यादी जाहीर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांचा विचार घेऊन उमेदवार जाहीर होतात. त्यामुळे इतर पक्षाची उमेदवारी जाहीर झाली की नाही याबाबत मला माहिती नाही आणि कोणाची झाली असेल, तर त्यावर मी भाष्य करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत सातारा हा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे आणि होताच! सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला नाही, तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, असे उदयनराजे म्हणाले.
महायुतीने तुम्हाला उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढणार का? या हटके प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मला उमेदवारी देणार नाही हे तुम्हाला कसं माहीत? तुम्ही काळजी करू नका. मी मागेच सांगितले आहे की उमेदवारी मलाच मिळणारच! एक लक्षात घ्या, लग्न छोटे असते, तेव्हा याद्या करणे सोपे असते, असा मिश्किल सवालही त्यांनी पत्रकारांना केला.
Post a Comment