तुमच्या प्रश्नासाठी दिल्लीत रस्ता रोको करणारा खासदार दिसेल
श्रीगोंदे तालुक्यातही लंके यांच्या यात्रेला उदंड प्रतिसाद
माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदे : कुकडी कालव्याचे पाणी सोलापूरपर्यंत सोडले जाते. आमच्या लोकांना मात्र पाणी, पाणी करावे लागते. समोरून पाणी जात असताना पाणी पाहण्याशिवाय पर्याय नसतो. आपण शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी संघर्ष करू. शेतकरी सुखी झाला तर सगळे सुखी होतील. शेतीच्या पाण्याबाबत तुम्ही काळजी करू नका. आपण पाण्यासाठी लढा उभा करू.अशी ग्वाही देत तुमच्या प्रश्नांसाठी दिल्लीत रस्ता रोको करणारा खासदार तुम्हाला दिसेल असे नीलेश लंके यांनी सांगितले.
गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेली नीलेश लंके यांची स्वाभीमान जनसंवाद यात्रा शुक्रवारी श्रीगोंदे तालुक्यात पोहचली. पहिल्या दिवसांपासून जनसंवाद यात्रेला नागरीकांकडून मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद आज ,शुक्रवारी श्रीगोंदे तालुक्यातही पहावयास मिळाला.
यावेळी बोलताना लंके म्हणाले की, तुम्हाला आजपर्यंत चुकीचे अनुभव आले. माझ्या बाबतीत असे होणार नाही. मी काम करणारा माणूस आहे. निवडणुका आल्या की गावात यायचे, मोठ-मोठ्या गप्पा मारायच्या, त्यानंतर परत मतदारसंघात फिरकायचेच नाही, असा कार्यकर्ता मी नाही. जनतेने संधी दिल्यानंतर त्याचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी, गावाच्या विकासासाठी झाला पाहिजे. सन २०१९ ला ज्यांना तुम्ही खासदार म्हणून निवडून दिले ते तुमच्या गावातही आले नाहीत,काम तर दुरच. गावाचा विकास हे लोकप्रतिनिधीचे काम असते. खासदार म्हणून तुम्ही लोकसभेत जाता. पाच वर्षात तुम्ही शेतकऱ्याचा एकही प्रश्न लोकसभेत उपस्थित केला नाही.खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे असा यांचा फंडा असल्याची टीका लंके यांनी खा. विखे यांचे नाव न घेता केली.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप,बाबासाहेब भोस,घनश्याम शेलार,साजन पाचपुते,प्रशांत दरेकर, टिळक भोस,मनोहर पोटे, हरिदास शिर्के, अनिल ठवाळ, संतोष इथापे, शिवदास उबाळे, संतोष खेतमाळीस, बाळासाहेब दुतारे, बाळासाहेब उगले, मुकूंद सोनटक्के, प्रा. संजय लाकूडझोडे, आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे,स्मितल वाबळे, शरद जमदाडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
निळवंडे, ताजनापुर, साकळाईचे आश्वासन फोल
राहुरी तालुक्यात निळवंडे, शेवगांव तालुक्यात ताजनापुर योजना, नगर- श्रीगोंदे तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई योजना पुर्ण केल्या नाही तर मते मागायला येणार नाही असे सन २०१९ मध्ये खासदारांनी सांगितले होते. आज लोक डाळ साखर वाटण्यापेक्षा काम काय केले हा प्रश्न विचारत असल्याचे लंके म्हणाले.
Post a Comment