माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्यास अजुन वेळ आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून विखे-लंके यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात मंगळवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी दिलं होतं. या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिले आहे.
इंग्रजी बोलणण्यावरून खासदार सुजय विखेंनी केलेल्या टीकेला आमदार निलेश लंकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, समोरचे उमेदवाराकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण मी एका शेतकर्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही. वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यापेक्षा पाच वर्षात काय काम केलं यावर बोला असं आव्हान आमदार निलेश लंकेंनी दिलं आहे.
काय म्हणाले होते सुजय विखे?
नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपाचे उमेदवार विखे यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरुन लंके यांच्यावर टीकेची झोंड उठवली होती. लंकेंनी पाठांतर करून का होईना, माझ्याएवढं इंग्रजी बोलावं, मी नगरमधून उमेदवारी अर्ज मागे घेईन असं आव्हान सुजय विखेंनी दिले होते. हा त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता.
रोहित पवार म्हणाले...
सुजय विखे यांनी निलेश लंके यांना दिलेल्या आव्हानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. आमदार रोहित पवार म्हणाले की, लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणार्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणार्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही, असा टोला आ. पवार यांनी विखे यांना लगावला आहे.
स्वाभिमान यात्रेला भर उन्हात प्रचंड प्रतिसाद
“लोकसभेत जाऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडायचे का फक्त इंग्रजीतच बोलत बसायचे” असा सवाल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी विचारला आहे. भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्यांची हेटाळणी केली होती. त्याला लंके यांनी अतिशय संयमीपणाने उत्तर दिले आहे.
निलेश लंके म्हणाले की, लोकसभेत देशभरातील खासदार निवडून येतात. ते आपापल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार आपापल्या भाषेत लोकांचे मुद्दे मांडतात. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील यांना इंग्रजी येत नव्हते म्हणून ते बोलायचे थांबले नाहीत. उलट मराठीत भाषण करणारे पहिले खासदार असा त्यांचा लौकीक आहे. क्रांतिसिंह नाना पाटील असोत किंवा दादा पाटील शेळके असोत, त्यांना लोकहिताचे मुद्दे मांडण्यासाठी कधीही भाषेचा अडसर आडवा आला नाही, याची आठवण देखील त्यांनी यावेळी करुन दिली.
काही दिवसांपुर्वी सुजय विखे यांनी राजकारण हे फक्त श्रीमंतांनी करावे गरीब राजकारणात केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी येतात असे विधान केले होते. याचा उल्लेख करुन लंके म्हणाले की, सर्वसामान्य गरीबाची मुलं मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. आर्थिक स्थिती थोडी बरी असलेल्यांची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. पण यामुळे कुठे गुणवत्ता मारली जात नाही. गुणवत्ता असेल माध्यम कुठलेली असले तरी मुले चमकतातच. संसदेतही जर खासदार लोकांच्या समस्येची जाण असणारा असेल तर कोणत्याही भाषेत त्यांचे प्रश्न मांडतो. उलट इंग्रजी येत असूनही एकही शब्द न उच्चारलेल्या खासदारांची यादी फार मोठी आहे.
दरम्यान, सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली असून संसदेत मराठी बोलण्याची लाज वाटते का असा प्रश्न सोशल मिडियातून तरुणाई विचारत आहे. साहित्यिक वर्तुळात देखील याबाबत चर्चा होत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भाजपाच्या सरकारने गेली दहा वर्षापासून रेंगाळत ठेवला आहे. त्यामागे हिच मानसिकता असल्याचे निरीक्षण साहित्यिक वर्तुळातून नोंदविले जात आहे.
निलेश लंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून त्यांनी नगर दक्षिण स्वाभिमान यात्रेस सुरुवात केली आहे. या यात्रेला भर उन्हातान्हात लोक हजर राहत असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
Post a Comment