माय नगर वेब टीम
पारनेर : तत्कालीन आमदार नीलेश लंके यांना ज्या सुपे परिसरातून वारंवार टार्गेट केले गेले,त्यांनी मंजुर केलेल्या कामांना वारंवार स्थगिती देण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले,त्याच सुप्यामध्ये खासदार नीलेश लंके यांचे ग्रामस्थांनी डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणा देत अभुतपूर्व स्वागत केले.लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सुप्यातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या जल्लोषाला अतिक्रमणे काढण्यात आलेल्या बाधितांच्या रोषाचीही किनार होती.
लोकसभा निवडणुकीचा निकाल दि. ४ जुन रोजी जाहिर झाल्यानंतर सुप्यामध्ये लंके यांचा विजयोत्सव साजरा करण्यात आला होता. या विजयोत्सवामध्ये खा. लंके हे सहभागी होऊ शकले नव्हते. सहा तालुक्यांतील चाहत्यांना वेळ द्यावा लागत असल्याने लंके हे गेल्या ४ जुनपासून सतत व्यस्त होते. त्यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतरही सुप्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात आला.
अखेर शुक्रवारी ,दि. २८ जुन रोजी लंके हे दिल्लीहून शपथ घेऊन परतल्यानंतर सुप्यातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्याच्या सुमारास लंके यांचे सुप्याच्या बस स्थानक चौकात आगमन झाले आणि उपस्थित हजारो तरूणांच्या उत्साहाला उधाण आले. अनेक तरूणांच्या हातामध्ये लंके यांच्या जयजयकाराच्या घोषणा असलेले फलक होते. लंके हे वाहनातून उतरताच त्यांना खांद्यावर उचलून घेण्यात आले व तरूणांनी एकच जल्लोष केला. डिजेच्या तालावर तरूण थिरकू लागले. मोठ्या संख्येने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत असल्याने आसमंत उजाळून निघाला होता.
माजी सभापती दिपक पवार, माजी सरपंच राजूशेठ शेख, सचिन पठारे, मा. सरपंच विजय पवार, सचिन पवार, मा. उपसरपंच हनिफ शेख, भाऊ निवडूंगे, किरण पवार, दिपक पवार, बाळासाहेब औचिते, सचिन काळे, प्रसाद पवार, अमोल पवार, अक्षय थोरात, उपसरपंच विजय पवार, विलास पवार, सचिन वाढवणे, शहारूख शेख, मा. उपसरपंच लहानू पवार, अमोल पवार यांच्यासह हजारो कार्यकर्ते मिरणुकीत सहभागी झाले होते.
खा. लंके भावूक
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मतदानानंतर सुप्यातील शेकडो अतिक्रमणे महसूल व बांधकाम विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आली. या अतिक्रमणधारकांनीही लंके यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. सत्काराप्रसंगी अतिक्रमणधारकांच्या डोळयात आश्रू उभे राहिले. त्यावेळी खासदार लंके हे देखील भावूक झाले होते. तुमच्या रोजी रोटीचा प्रश्न राजकारणापायी निर्माण झाला असला तरी आता मी तुमच्या पाठीशी आहे तुमचा प्रश्न मी मार्गी लावील अशी ग्वाही लंके यांनी यावेळी दिली.
सुप्यातून सुरू झालेला संघर्ष संसदेपर्यंत पोहचला
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नीलेश लंके यांची चोहोबाजूंनी कोंडी सुरू झाली. अजित पवार हे महायुतीध्ये सहभागी झाल्यानंतर नीलेश लंके यांनीही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तरीही लंके यांच्या मागील ससेमिरा कमी झाला नाही. उलट लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचा जाच अधिकच सुरू झाला. त्यामुळे लंके यांनी कोणत्याही परिस्थतीत लोकसभा लढवायचीच असा निर्धार करून ते शरद पवार यांच्या गटात सामील झाले. आणि विजयी देखील झाले. सुप्यातून लंके यांचा सुरू झालेला संघर्ष त्यांना संसदेपर्यंत घेऊन गेला. आपल्याला झालेल्या त्रासामुळेच आपण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे लंके यांनी यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले होते.
धार्मिक भावनांचाही विषय
अतिक्रमणे काढताना मंदिर तसेच दर्गाही हटविण्यात आल्याने धार्मिक भावनांनाही ठेच पोहचली होती. त्याचा रोषही नागरीकांमध्ये होता. अतिक्रमणे हटविण्यात येत असताना नागरीकांना नीलेश लंके यांच्याशी संपर्कही केला. लंके यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दबावाचे कारण पुढे करण्यात आल्याने लंके यांचाही नाईलाज झाला होता. शुक्रवारी पार पडलेल्या मिरवणूकीदरम्यान नागरीकांनी त्यांच्या भावना खा. लंके यांच्याजवळ बोलून दाखविल्या.
Post a Comment