माय नगर वेब टीम
अहमदनगर – गावातील रस्त्याचे मुरुमीकरण सुरु असताना माझ्या घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत मागासवर्गीय सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी (दि.२०) दुपारी घडली. या घटनेतील हल्लेखोर अय्याज शौकत शेख याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अॅक्ट सह अॅट्रॉसीटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या बाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. सध्या पावसाळा असल्याने घोसपुरी गावात रस्त्यात चिखल होवू नये म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. शनिवारी (दि.२०) दुपारी ३ च्या सुमारास सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही जण हे काम कसे चालले आहे याची पाहणी करत होते. त्यावेळी आरोपी अय्याज शेख तेथे मोटारसायकल वर आला.
त्याने सरपंच साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुला सांगितले ना माझ्या घरासमोर मुरूम टाकू नको, तु जातीच्या जीवावर लय माजला काय, थांब तुझा माज जिरवतो, असे म्हणत पळत घरात गेला व घरातून धारदार कोयता आणून सरपंच साळवे यांच्यावर वार केला. मात्र त्यावेळी सरपंच साळवे मागे सरकल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या आईने त्याच्या अंगावर उडी मारली व त्याचा वार हुकवला. त्यानंतर त्याने सरपंच साळवे तसेच उपसरपंच विठ्ठल हंडोरे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत सरपंच साळवे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. स.पो.नि. प्रल्हाद गीते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. तसेच घटनेच्या वेळीचे छायाचित्रीकरण पाठवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचना व मार्गदर्शनानंतर याबाबत आरोपी अय्याज शौकत शेख याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अॅक्ट सह अॅट्रॉसीटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नगर ग्रामीणचे प्रभारी उपअधीक्षक अमोल भारती यांच्या कडे देण्यात आला आहे.
Post a Comment