लोढा हाईट्स मधील पावभाजी व ज्यूस सेंटरचे अनाधिकृत अतिक्रमण हटवा; कोणी केली मागणी पहा



सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांचे आयुक्तांना निवेदन

त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वाहन तळावर ताबा मारल्याने रस्त्यावर लावली जातात वाहने

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - शहराच्या मध्यवस्तीत नवीपेठ कॉर्नर येथे असलेल्या लोढा हाईट्स या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील पावभाजी व ज्यूस सेंटरचे असलेले अनाधिकृत अतिक्रमण त्वरीत हटवावे व या इमारती मधील ताबा मारण्यात आलेले वाहन तळ खुले करुन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास थेट लोढा हाईट्स या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर उपोषणास बसण्याचा इशारा भिंगारदिवे यांनी दिला आहे.

शहरातील मध्यवस्तीत व गर्दीचे ठिकाण असलेले नवीपेठ कॉर्नर येथे लोढा हाईट्स हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीतील काही गाळे एका इसमाने अनाधिकृतपणे बळकावलेले आहे. तसेच या इमारतीत साईड मार्जिनमध्ये अनेक वर्षापासून पावभाजी व ज्यूस सेंटरचे हॉटेल चालविण्यात येत आहे. हे हॉटेल बऱ्याच वर्षापासून एका राजकीय व्यक्तीच्या वरदहस्ताने चालवले जात आहे. तर या इमारतीतील वाहन तळाची जागा बळकावून ते वाहन तळ नागरिकांना वापरु दिला जात नाही. पर्यायाने वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याचा आरोप भिंगारदिवे यांनी केला आहे.

सदर पावभाजी व ज्यूस सेंटरला कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नाही. त्यामुळे हे हॉटेल अनाधिकृतपणे चालविण्यात येत आहे. साईड मार्जिन मधील अतिक्रमण असल्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता या हॉटेलचे अनाधिकृत बांधकाम तातडीने पाडण्यात यावे, हे हॉटेल फार पूर्वीपासून सुरु असल्याने आत्तापर्यंतची व्यवसायिक कर वसुली करावी व लोढा हाईट्स या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील वाहन तळ खुले करण्याची मागणी पवन भिंगारदिवे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post