माय नगर वेब टीम
अहमदनगर: महापालिका कामगारांना दिवाळी सणासाठी ११ हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सर्व पात्र कामगारांना दिवाळीपूर्वी एकरकमी अनुदान वर्ग करण्याचा, तसेच १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या सुमारे ३०० कामगारांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी मंजूर केला आहे. कामगार युनियन व प्रशासनाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
कामगार यूनियनने महापालिकेला संपाची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर काल बैठक झाली. यात ११ हजारांचे दिवाळी सानुग्रह अनुदान, कालबध्द पदोन्नतीचा फरक ९३ लाख रुपये ३१ जुलैपूर्वी अदा करणार, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही जेष्ठता न लावता तात्काळ प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जातील, सफाई कामगारांना कचरा वाहण्यासाठी ढकल गाडी उपलब्ध करून देण्यात येईल, निवड समिती घेऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील, लाड व पागे समिती शिफाराशीनुसार ३०५ व ५०६ सह पात्र कामगारांच्या वारसाना नोकरी देण्यात येईल, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. बैठकीस कामगार यूनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment