माय नगर वेब टीम
अहमदनगर :- अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासला व इतर धरणातुन विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असुन दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भिमा नदी काठावरील श्रीगोंदा व व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील गावातील नागरिकांना अति सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातुन गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी,ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्याासाठी गर्दी करु नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालिन परिस्थितीमध्ये नजीकच्या तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री) अथवा 2356940 येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Post a Comment