नगरमध्ये पोलिसांचा वचक संपलाय!; गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोयच, अवैध धंद्यांना सुगीचे दिवस...

 


माय नगर वेब टीम

अहमदनगर ः नगर शहरामध्ये दिवसा ढवळ्या खून, दरोडे, चोऱ्या, अत्याचार हे आता नवीन राहिले नाही. त्यातच पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे गुऱ्हेगारी वाढण्यात भर पडली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचा वचक संपलाय का असा सवाल आता नगरकर उपस्थित करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात कृष्णप्रकाश, विश्वास नांगरे पाटील, ज्योती प्रिया सिंग, रंजनकुमार शर्मा यांच्यासारखे धडाकेबाज एसपी होऊन गेले. त्यांनी गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम केले. भल्या भल्यांना धडा शिकवला. त्यांच्या या बेधडक कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला होता. परंतू सध्याच्या परिस्थितीत पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक संपलाय का? असाच सवाल उपस्थित होत आहे.

नगरमध्ये चौका चौकात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. थेट पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अवैध धंदे करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत आहे. अवैध धंद्यातूनच ओंकार भागानगरेसह अनेकांचा बळी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. एमआयडीसीतील नग्न धिंड प्रकरण ताजे आहे. कोतवाली, तोफखाना आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या काराऱ्यांविषयी सातत्याने नगरकरांसह राजकीय पुढाऱ्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.


'कलेक्टर'च हाकतात पोलिस स्टेशनचा कारभार

नगरमध्ये कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी आणि भिंगार ही महत्वाची पोलिस स्टेशन आहेत. यापूर्वी पोलिस ठाण्याचे अधिकारी जनतेत येवून नागरिकांशी संवाद साधायचे. विविध समाज बांधवांच्या बैठका घ्यायचे. कायदा सुव्यवस्था आबाधित राहीत यासाठी मार्गदर्शन करायचे. विविध शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जायचे. त्यामुळे त्यांची जनतेशी नाळ जोडली जायची. परिणामी गुन्हेगारांवर वचक रहायचा. गुन्ह्यांची उकल होण्यास मदत व्हायची. त्यातूनच हा आपल्या पोलिस स्टेशनचा अधिकारी आहे अशी ओळख निर्माण व्हायची. परंतू, सद्यस्थितीत कोणत्या पोलिस स्टेशनला कोणता अधिकारी आहे हेच नागरिकांना माहिती होत नाही. त्यांची सारीच यंत्रणा तेथील कलेक्टर चालवत असल्याचे भयान वास्तव आहे. पोलिस ठाण्याचे अधिकारी कोण आहेत हे नागरिकांना सहजपणे सांगता येणार नाही परंतू तेथील 'कलेक्टर' कोण हे मात्र लगेच सांगता येईल अशी नगर शहरातील पोलिस ठाण्याची झाली आहे. एखांद्याला गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या फिर्यादीला साहेबांच्या अगोदर तेथील कलेक्टरला भेटावे लागते. काही गोष्टींची बातचीत झाल्यानंतरच त्या फिर्यादीला न्याय मिळतो. अन्यथा.....


एसपी साहेबांच्या आदेशाला केराची टोपली

गेल्या वर्षी पोलिस प्रशासनात अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजरही झाले. काहींना एक वर्षाची संधी देण्यात आली. परंतू, बदली होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला तरी बदली झालेले कर्मचारी आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. अक्षशः त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पोलिसच आदेश पाळत नसतील तर प्रशासनावर वचक कसा राहणार आणि गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण होणार असा रोकडा सवाल नगरकर उपस्थित करत आहेत. दरम्यान, कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी आणि भिंगार पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एसपी कोणते पाऊस उचलला, तसेच बदलीच्या ठिकाणी हजर न झालेल्यांबाबत कोणता निर्णय घेतात हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हॉटेल चालकांना पोलिसांचा 'आशिर्वाद'

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट बार यांना रात्री 11 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी आहे. तथापि काही विशेष परिस्थितीत विशेष परवानग्या घेऊन ही वेळ वाढवता येऊ शकते. परंतू, नगरमध्ये विशेषतः कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दतील प्रसिद्ध हॉटेल चालकांना पोलिसांचा रात्रभर खुली ठेवण्यासाठी खुला आशिर्वाद असल्याचे नगरकरांमधून बोलले जात आहे.  तोफखाना, एमआयडीसी, भिंगार पोलिस स्टेशनच्या हद्दीत यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. या पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेले अवैध धंदे कधी बंद होणार असा सवाल नागरिक करत आहेत.


अवैध धंद्यांचे 'रेटकार्ड'च जाहीर

पुणे येथील पोर्शकार अपघात प्रकरणानंतर तेथील पोलिस यंत्रणेने संबंधित आरोपीला कशी मदत केली. कशी शाही वागणूक दिली हे माध्यमांनी समोर आणले आहे. तसेच आमदार रविंद्र धंगेकर यांनी तर पोलिस प्रशासनाची पोलखोल करत पोलिस प्रशासनाचे कारनामे जाहीर केले. पोलिस व अधिकाऱ्यांची नावे सांगत रेटकार्डच जाहीर करुन टाकले. या प्रकारामुळे पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली. नगरमध्येही प्रत्येक अवैध धंद्यासाठी पोलिसांचे रेटकार्ड ठरले आहे. मटका, बीफ, गुटखा, पत्याचा क्लब, अवैध दारू विक्री, गांजा, पान टपरी, चंदन तस्करी, बिंगो, वाळू, मुरुम यासत्तठी पाच हजार रुपयांपासून ते लाखापर्यंतचे रेटकार्ड ठरले आहे. या अवैध धंद्यांच्या माध्यमातून मलिदा जमा करण्याचे काम काही पोलिसांकडून केले जाते. त्यामुळे अवैध धद्यांना आळा कसा बसणार असा सवाल नागरिक करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post