माय नगर वेब टीम
अहमदनगर : पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यावर कारवाई करावी. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेलाही कारवाईची मोहीम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून येईल, त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधीक्षक ओला यांनी दिला आहे.
खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर पोलिस अधीक्षक ओला ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र आहे. उपोषण सुटताच दुसऱ्याच दिवशी (शुक्रवारी) अधीक्षक ओला यांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षक कार्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. यात अधीक्षक ओला यांनी पोलिस ठाणेनिहाय कारवाईचा व गुन्ह्यांच्या प्रलंबित तपासाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी धडक मोहीम सुरू करावी, असे निर्देश पोलिस ठाण्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात जुगारावर ७१० कारवाया झाल्या आहेत. अवैध दारू प्रकरणी २५२१, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या विक्री, बाळगल्याप्रकरणी १७३ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच, आर्म ॲक्ट अंतर्गत कट्टे बाळगल्याप्रकरणी ३१, तर इतर हत्यारे बाळगल्याप्रकरणी ११० कारवाया करण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षात जास्त कारवाया केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चालू वर्षात १४ सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात तपास पूर्ण करून गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
Post a Comment