महिलांना खुशखबर; जिल्हा परिषदमध्ये 727 जागांची भरती प्रक्रिया सुरु, अशी होणार निवड

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर : एकात्मिक बाल विकास सेवेअंतर्गत अंगणवाडी मदतनिसांची पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षीच शासनाने ही भरती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यात रिक्त असलेल्या ७२७ मदतनिसांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यानिमित्ताने बारावी उत्तीर्ण महिलेला गावातच नोकरीची संधी मिळणार आहे. दुसरीकडे उमेदवारांना भरतीबाबत काही आमिषे दाखवली जात आहेत. मात्र ही प्रक्रिया पारदर्शक होणार असून उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला बालकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्रा धारण करत मागील वर्षी मोठे आंदोलन केले. त्यात त्यांच्या अनेक मागण्या मान्य करत शासनाने राज्यातील ज्या काही १३ हजार मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून मान्यता दिली. शिवाय १३ हजार अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता ही भरती जिल्ह्यात सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्यात साडेपाच हजार अंगणवाड्या आहेत. त्यात अंगणवाडी सेविकांच्या एकूण ५ हजार ३७५ मंजूर पदांपैकी २३३ पदे रिक्त आहेत. तर ५ हजार ३७५ मदतनिसांच्या मंजूर पदांपैकी ४ हजार ६४८ पदे भरलेली व ७२७ पदे रिक्त आहेत.

अंगणवाडी मदतनिसांची निवड गावातीलच महिलांमधून होणार आहे. किमान शैक्षणिक अर्हता १२ वी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे.


अशी होणार निवड

मदतनीस पदासाठी एकूण १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. यात बारावीत ८० टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर ६० गुणांकन होईल. याशिवाय उमेदवार पदवीधर, डी.एड., बी.एड., एमएस.सीआयटी धारक असेल तर अतिरिक्त गुण मिळतील. विधवा, अनाथ, तसेच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव असल्यास अशा विविध बाबींचे गुणांकन करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यातून अंतिम निवड होणार आहे. परंतु गावस्तरावर काही लोक किंवा तालुकास्तरावर अधिकारी या निवडीत वशिलेबाजी किंवा आर्थिक आमिष दाखवतात. त्यातून उमेदवारांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महिला बाल विकास विभागाने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post