मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी पैसे मागितल्यास कारवाई होणार : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ



माय नगर वेब टीम 

अहमदनगर  :- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेचा अर्ज भरतांना महिलांना सहकार्य करण्याच्या तसेच अर्ज भरण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची आर्थिक मागणी न करण्याच्या सूचना अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तथापि तशा स्वरूपाची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास व त्यात तथ्य आढळून आल्यास संबधीत शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध फ़ौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  व्ही.सी.द्वारे  सर्व जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन योजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

    महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी  या योजनेची  जिल्ह्याच्या ग्रामिण व शहरी भागामध्ये व्यापक स्वरुपात अंमलबजावणी करण्यात येत आहे.  "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा यासाठी अंगणवाडी केंद्र,ग्रामपंचायत कार्यालय,वार्ड अधिकारी,सेतु केंद्र आदी ठिकाणी पात्र महिलांना योजनेचा ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  

अर्ज भरण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची आर्थिक मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास व त्यात तथ्य आढळून आल्यास त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी दिला असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post