माय नगर वेब टीम
अहमदनगर : लाचखोरीचा गुन्हा दाखल झालेले महापालिकेतील आयुक्तांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज, बुधवारी फेटाळला. विशेष न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी यासंदर्भातील आदेश दिला.
श्रीधर देशपांडेच्या वतीने युक्तिवाद करताना वकील महेश तवले यांनी सांगितले की, तक्रारदार व देशपांडे यांची ओळखच नव्हती. तक्रारदाराकडूनच रक्कम स्वीकारण्याचा आग्रह धरला जात होता. सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी व तक्रारदाराचे वकील अभिजीत पुप्पाल यांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, देशपांडे यांच्या घरात ९ मालमत्तांचे खरेदीखत, ९७ हजारांची दागिने आढळले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी कोठडी आवश्यक आहे.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने देशपांडेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. बांधकाम व्यवसायीकाकडून बांधकाम परवानगीसाठी ८ लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून तत्कालीन आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहायक श्रीधर देशपांडे या दोघांविरुद्ध लाचेच्या मागणीचा गुन्हा यापूर्वीच तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. दोघेही अद्याप फरार आहेत. आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर ३१ जुलैला सुनावणी होणार आहे.
Post a Comment