शहर विकासाची विखे-जगताप सहमती एक्सप्रेस सुसाट, 'हा' प्रश्न लागला मार्गी



 महिला, बालविकास भवन व ग्रंथालय कार्यालय जागांसाठी सरकारचा हिरवा कंदील

डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा । शासनाच्या मान्यतेचे महापालिका आयुक्तांना पत्र

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - शहरातील सावेडी येथे महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत अहमदनगर महापालिकेने केलेल्या विनंतीस महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी नगर महापालिका आयुक्तांना तसे मान्यतेचे पत्र दिले आहे. या संदर्भात माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे या पत्राने अधोरेखित झाले आहे.


सावेडी येथील सर्वे नंबर 232 /1 अ/ ते 6, 242/1 पैेकी या जागेमधील महापालिकेच्या मालकीची 4411.50 चौरस मीटर ही जागा अहमदनगर जिल्हा मुख्यालय ठिकाणी महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी उपलब्ध करण्यासदंर्भात अहमदनगर महापालिकेने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद दाखवून नगरविकास विभागाने नममात्र एक रुपया दराने 30 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर ही जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी काही अटी नगरविकास विभागाने घातल्या आहेत.

संबंधित जागा ज्या कारणासाठी दिली आहे, त्याच कारणासाठी वापरण्यात येईल याची दक्षता घ्यावी. संबंधित जागा भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी रीतसर आवश्यक अटींसह महापालिकेने करारनामा करावा. जागा देताना कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या संदर्भात कोणतीही कायदेशीर बाब उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या आयुक्तांवर असणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनिय 26 नोव्हेंबर 2023 व नगरविकास विभाग शासन निर्णय नामपा 1221/प्र. क्र. 166 नवि. 26. दिनांक 07 नोव्हेंबर 2023 मधील संबंधित अटी वा शतींचे पालन करण्यात यावे, असे घातलेल्या अटी किंवा शर्तींमध्ये म्हटले आहे.

शहर विकासाची विखे-जगताप सहमती एक्सप्रेस सुसाट

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी एकत्र येत उड्डाणपूलाचे काम मार्गी लावले. तसेच नगर कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पुलासाठी निधी मंजूर करून आणला आहे. शहर विकासासाठी भरीव निधी आणला आहे. डॉ. विखे व आ. जगताप यांच्या शहर विकासाच्या सहमती एक्सप्रेसमुळे शहराच्या विकास कामांत मोठी भर पडत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post