माय नगर वेब टीम
अहमदनगर : अहमदनगर पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखा ही गुन्हे रोखण्यासाठी की फक्त खंडणी वसुल करण्यासाठी आहे असा प्रश्न उपस्थित करून ही शाखा जिल्हयात गुंडगिरी पाठीशी घालून खंडणी वसुल करीत असल्याचे खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. खा. लंके यांच्या उपोषणादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींच्या प्रतीही त्यांनी पत्रासोबत जोडल्या आहेत.
खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत पत्रान्वये अवगत करण्यात येउनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने दि. २२ जुलै पासून आपण पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहोत. उपोषणादरम्यान पोलीस प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीसांच्या वर्तणुकीसंदर्भात गंभीर तक्रारी समोर आल्या आल्याचे लंके यांनी म्हटले आहे.
गंगापुर जिल्हा औरंगाबाद येथील सोनार दुकानदारास गुन्हयात अडकविण्याची धमकी देऊन त्यांना विनाक्रमांकाच्या गाडीमधून जबरदस्तीने उचलून आणण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डीले, संदिप दरंदले व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी १७० ग्रॅम सोने जबरदस्तीने वसुल केले.
शेवगांव येथील सराफाच्या दुकानात बनावट आरोपी आणून सोने विकत घेतल्याचा आरोप करून कर्मचारी भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले व संतोष लोंढे यांनी दमदाटी व खोटया गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवून ५० ग्रॅम सोने व ५० हजार रूपये वसुल करण्यात आले.
गंगापुर ता. औरंगाबाद येथील तिरूपती ज्वेलर्स या दुकानदाराने चोरीची वस्तू घेतल्याचा आरोप करून दत्तात्रेय गव्हाणे याने ९० हजार रूपये बळजबरीने घेतले.
नगरमधील प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या व्यवसायीकाला दरोडयाच्या गुन्हयात अटक करायची आहे असे सांगून रवी कर्डीले, शिवाजी ढाकणे, दिनेश आहेर व इतर पाच ते सहा जणांनी दोरीने बांधून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. चोरीचे सोने घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या पत्नीकडून २ लाख ११ हजार ७१२ रूपयांचे दागिने घेण्यात आले.
शेवगांव तालुक्यातील वडूले खुर्द येथील भुसा व किराणा माल व्यवसायीकांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खोट्या गुन्हयात अडविण्याची धमकी देऊन ५ लाख रूपये वसुल करण्यात आले.
गंगापुर जि. औरंगाबाद येथील सदभावे ज्वेलर्स यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून त्यांच्या दुकानातील १ किलो ३५ ग्रॅम सोने, २ किलो चांदी व ३ लाख रूपये उकळण्यात आले.
नेवासा तालुक्यातील सिध्दीविनायक ज्वेलर्स यांना दुकानातील दागिने चोरीचे आहेत असे सांगून मारहाण करण्यात आली. त्यांच्या दुकानातील ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीचे दागिने ताब्यात घेऊन पैशांची मागणी करण्यात आली.
गंगापुर येथील सुर्वणकारास खोटया गुन्हयाची धमकी देऊन ५ ग्रॅम सोन्याची मागणी करण्यात आली. २२९ ग्रॅम सोने घेउन प्रकरण मिटविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी गंभीर मुद्दे
स्थानिक गुन्हे शाखा जिल्हयातील व जिल्हयाच्या सिमावर्ती भागातील सुवर्णकारांना टार्गेट करत आहे.सुवर्णकारांना चोरीचे सोने विकत घेतल्याची धमकी दिली जाते. तपासाच्या नावाखाली, गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्याच्या नावाखाली सोन्याच्या दुकानातील माला ताब्यात घेतला जातो. सुवर्णकार बदनामीच्या भितीने, मारहाण व खोटया धमक्यांना बळी पडून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना पैसे देतात. त्यातून सुवर्णकार कर्जबाजारी झाले असून काही सुवर्णकारांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेकांना मानसिक धक्का बसलेला आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी विना क्रमांकाची बोलेरो गाडी तर काही ठिकाणी विना नंबरच्या खाजगी गाडयांचा वापर करण्यात येतो. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कारवाई करताना सबंधीत पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोद करणे आवश्यक असते परंतू तसे केले जात नाही. गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची रिकव्हरी पुर्ण न दाखविता त्यातील काही मुददेमाल स्वतःकडे ठेवला जातो. जिल्ह्यातील सुवर्णकार व इतर व्यवसायीकांकडून खंडणी वसुलीचे रॅकेटच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी चालवत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोटयावधी रूपयांची संपत्ती जमा केली आहे.
Post a Comment