एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी; राज्याच्या पोलीस महासंचालक रष्मी शुक्ला यांचे आश्‍वासन




खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे / माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई फळाला 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर :    नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत खासदार नीलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेत लंके यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आल्यानंतर खा.लंके यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण गुरूवारी,चौथ्या दिवशी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन मागे घेण्यात आले. 

       खा. लंके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर नगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळाने तीन वेळा चर्चा केली. मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आंदोलनात तोडगा निघू शकला नव्हता. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याकडूनही ठोस आश्‍वासन देण्यात येत नसल्याने तिसऱ्या दिवशीपर्यंत या आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती. 

     गुरूवारी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी येत खा. नीलेश लंके यांच्याशी चर्चा केली. लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी चर्चा केली. मात्र लंके हे आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबध्द आश्‍वासन हवे होते. त्यामुळे मा. मंत्री थोरात यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. शुक्ला व मा. मंत्री थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन उपोषण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.


     मा. मंत्री बाळासाहेब थोरात व रष्मी थोरात यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खा. लंके यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी शुक्ला यांची चर्चा झाल्यानंतर झालेल्या चर्चेनुसार लंके यांना कराळे यांनी लेखी आश्‍वासन दिले. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून कराळे यांचे पत्र लंके यांना देण्यात आल्यानंतर खा. लंके यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले मा. नगरसेवक योगीराज गाडे, बबलू रोहकले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले. 


असे आहे आश्‍वासन

खा. लंके यांनी केलेल्या चौकशीच मागणी मान्य करण्यात आली असून त्यासाठी नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधिक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी पंधरा दिवसांत तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर  करतील. ही चौकशी आवश्यकता असेल तर इन कॅमेरा करण्यात येईल. पंधरा दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरात

माजी मंत्री 


महाविकास आघाडी, सामान्यांच्या पाठबळाचा विजय

मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हाभरातील सर्वसामान्य नागरीकांनीही या आंदोलनास पाठबळ दिल्याने हे आंदोलन यशस्वी ठरले.

खा. नीलेश लंके 


 खा. लंके दिल्लीकडे रवाना

आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खा. नीलेश लंके हे गुरूवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. आंदोलनामुळे थकवा आलेला असतानाही सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी मला दिल्लीला जाणे भाग असल्याचे लंके यांनी सांगितले. 


पोलीस अधिक्षकांची भेट नको 

उपोेषण सुरू होऊन दोन दिवस पोलीस अधिक्षक राकेश ओला हे उपोषणस्थळी  फिरकले नाहीत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी खा. नीलेश लंके यांनी राकेश ओला हे चर्चेसाठी आले तरी मी त्यांच्याशी बोलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आश्‍वासन देण्यात आल्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. 


संघर्षयोध्दा जिंकला 

पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर लढणारे खा. नीलेश लंके पहिलेच खासदार आहेत. नगर दक्षिणच्या मतदारांनी निवडलेल्या या लोकप्रतिनिधीचा मला अभिमान आहे. हा संघर्षयोध्दा आज जिंकला याचा आनंद आहे.

बाळासाहेब थोरात

मा. मंत्री

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post