वाडेगव्हाण येथे सुपा गटाच्या वतीने नागरी सत्कार
माय नगर वेब टीम
पारनेर : आता मी राहत्यामध्येच जाऊन बसणार आहे असे सांगत खा. नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना शनिवारी वाडेगव्हाण येथून थेट आव्हान दिले. वाडेगव्हाणच्या मेळाव्यात बोलताना खा. लंके म्हणाले, कालच मी पवार साहेबांना सांगितलंय की राहत्याचा निर्णय लवकर घ्या आणि माझ्यावर जबाबदारी देऊन टाका. मी करतो काय करायचे ते. तुम्हाला साखरेत मळले, घोळले तरी तुमचे वाकडं ते वाकडंच. आमच्या शेपटावर पाय दिला तर मलाही नीलेश लंके म्हणतात असे सांगत लंके यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.
वाडेगव्हाण गटाच्या वतीने आयोजित नागरी सत्कारास उत्तर देताना खा. नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर जोरदार शरसंधान केले.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, निवडणूक आयोगाकडे अर्ज करून मशिनची फेरतपासणी करण्यासाठी १८ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. तज्ञांच्या मते मतदान मशिनमध्ये काहीही फेरफार होणार नाही. असे झाले तर संपूर्ण देशातील निवडणूकीवर संशय घेतला जाईल. काल परवा उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अहो, तुमचे वडील असतील,आजोबा असतील इथे नीलेश लंके आहे. म्हणूनच तुमची जिरवली. माझ्याकडे कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, बुध्दी आहे म्हणून तर जिरवली ना ? खरे तर आपण हरकत घ्यायला हवी होती. चोराच्या उलटया बोंबा यालाच म्हणतात. लोकांनी जिरवली तर आता आमच्या चुका झाल्या, आम्ही कमी पडलो, आता आपण सुधरून वागले पाहिजे. पण एखाद्याचं शेपट वाकडं ते वाकडंच असतं असे सांगत खा. लंके यांनी विखे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली.
याप्रसंगी खा. लंके यांची वहया तुला करण्यात आली. यावेळी बाबाजी तरटे, अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, सुदाम पवार, प्रा.संजय लाकूडझोडे, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, सतीश भालेकर, सचिन पठारे,कारभारी पोटघन, प्रकाश गुंड, सरपंच प्रियंका यादव, उपसरपंच एकनाथ शेळके, सदस्य चौताली यादव यांच्यासह विविध गावांचे सरपंच, चेअरमन, सदस्य, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
मी दोनदा आलो, त्यांच्या पन्नास चकरा झाल्या !
अनेक जण सांगतात लोकसभेची निवडणूक जिंकणे अशक्य गोष्ट होती. मात्र आपण अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. हे शक्य मी नव्हे तर तुम्ही करून दाखविले आहे. मी एक माध्यम आहे. मी सगळया ठिकाणी पोहचू शकत नाही. संपूर्ण लोकसभा निवडणूकीत मी फक्त दोन दिवस तालुक्यात आलो. त्या तुलनेत विरोधी उमेदवाराच्या व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या पन्नासच्यावर चकरा झाल्याचे खा. लंके म्हणाले.
दिल्लीत सर्व जुळवून आलोय
खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर सुरळीत हाईल की नाही शंका होती. चार दोन दिवस थांबलो आणि सर्व काही जुळवून आलो आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीचेही कामकाज असल्याने काही अडचण येणार नसल्याचे लंके म्हणाले.
बारा नंतर स्टेट्स बदलणारे लक्षात आले !
महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होईपर्यंत ३६५ दिवस आपल्या सोबत असलेले महायुतीचे सरकार आल्यानंतर विरोधकांच्या कळपात गेले.मी खासदार झाल्यानंतर पुन्हा आमच्याकडे येऊ पाहत आहे. खरं तर मी परमेश्वराला धन्यवाद देतो की मतमोजणीच्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत आपण मागे होते ते चांगले झाले. बारा वाजेपर्यंत विरोधकांचे स्टेटस ठेवलेले आपण मतमोजणीत पुढे गेल्यानंतर आपले स्टेटस ठेवणारे लक्षात आले. आपल्या कार्यालयात अशा लोकांच्या स्टेटसचे स्क्रिन शॉटही पहावयास मिळतील असेही लंके यांनी सांगितले.
तर तुमचा सातबारा वाचून दाखवू !
आतापर्यंत झालं ते झालं, इथून पुढे आमच्या नेत्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला तर तुमचा सातबारा वाचून दाखविण्याची आमच्यात धमक आहे. खा. लंके यांच्या विजयामुळे सुपा जिल्हा परिषद गटाचे भाग्य उजळले असून आपल्यासाठी हा सोनेरी क्षण आहे.
सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे
Post a Comment