फेरमतमोजणीच्या मागणीवर खा. लंके यांचा डॉ. विखेंवर हल्लाबोल, काय म्हणाले पहा..



फेरमोजणीत काही निष्पन्न होणार नाही, लंके यांचा  विश्वास 

माय नगर वेब टीम 

 ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक  आमच्यासारख्याने तक्रार करायला हवी होती. तुम्ही भाजपाचे, देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्‍वास दाखवत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत असे सांगत खा. नीलेश लंके यांनी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या फेरमतमोजणीच्या मागणीवर माध्यमांजवळ प्रतिक्रीया देताना  विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. 

        विशिष्ठ मतदान केंद्रांवरील मतांची फेरमतमोजणी करण्यासाठी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यावर मॉक पोल घेण्यात येणार असल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी  विचारलेल्या प्रश्‍नांवर बोलताना खा. लंके यांनी हंगे येथे बोलताना बेधडक उत्तरे  दिली.  

        खा. लंके म्हणाले, जरी मॉक पोल झाला तरी माझा निवडणूक आयोगावर व त्या यंत्रणेवर माझा शंभर टक्के विश्‍वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नसतो. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. उद्या जर या यंत्रणा, मशिन मॅनेज होत असत्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलेच नसते असे लंके म्हणाले.  

        एकाही मतदान केंद्रावर काहीही गडबड आढळणार नाही. निवडणूक आयोगाची ही यंत्रणा आहे. प्रत्येक मशिन मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. मॉक पोल घेतला जातो त्यानंतर ते मतदान मोजले जाते व त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान  प्रक्रिया सुरू करण्यात येते असे लंके म्हणाले. 

     माझ्या मतदारसंघात मी सर्व बारकाईने पाहिलेले आहे. त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे. त्यामुळे कोठेही हेराफेरी होणार नाही. काही होणार नाही तर त्यावर चर्चा कशाला करायची ? असा सवाल लंके यांनी केला. 

       फेरमतमोजणीचा हा निकाल देशात जाणार आहे. त्यात काही गडबड आढळल्यास विरोधी पक्षांकडून ईव्हीएममध्ये गडबड होते या आरोप खरा ठरला जाईल हे माध्यम प्रतिनिधींनी  निदर्शनास आणून दिल्यानंतर लंके म्हणाले, माझ्या मतदासंघातील ज्या ४० मतदान केंद्रांची फेरमतमोजणी करण्यात येणार आहे, त्यात एक मताचाही फरक पडणार नाही. आता समाजापुढे जायचे तर कसे जायचे ? समाजाला हे सांगू शकत नाही की आम्ही आमच्या कर्तुत्व गुणामुळे पराभूत झालो. त्यासाठी मशिनमध्ये गडबड आहे, मशिन मॅनेज केल्या आहेत हे सांगतले जाते. अशा गोष्टींकडे फार लक्ष न देता आपण काम करीत राहणे ही आपली भूमिका असल्याचे लंके यांनी सांगितले.

फेरमतमोजणीची मागणी म्हणजे रडीचा डाव !

ओनिवडणूकीच्या काळात यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणूकीला सामोरे जायचे असे त्यांचे काम आहे. आता फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव आहे. आपलं  अपयश, आपलं काळं तोंड समाजापुढे कसे दाखवायचे ? यासाठी हा बालीशपणा सुरू आहे. त्यात काही होणार नाही असे लंके यांनी ठामपणे सांगितले. 

त्यांच्या आजोबांनीही तेच  केले !

१९९१ ची पुनरावृत्ती होऊ शकते का ? या प्रश्‍नावर  बोलताना १९९१ मध्ये त्यांच्या आजोबांनी हेच  केले. त्यांच्या कुटूंबाची ही परंपरा आहे. त्याच  चालीवर जाण्याची काही कुटूंबाची एक खासीयत असते असे सांगत खा. लंके  यांनी विखे परिवारावर टिकाश्र सोडले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post