माय नगर वेब टीम
अहमदनगर - गुन्हा मागे घेण्यासाठी तरूणाला मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आले. किरण शिवाजी शिंदे (वय 35 रा. वैदुवाडी, सावेडी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (23 जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
विशाल संतोष शिंदे, मीरा संतोष शिंदे (दोघे रा. वैदुवाडी, सावेडी) व दोन अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी किरण व त्यांच्या घरातील सर्व जण घराच्या बाहेर अंगणात बसलेले असताना विशाल तेथे आला व त्याने किरण यांना मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून तुम्ही माझ्या भाऊ अक्षय संतोष शिंदे (रा. वैदुवाडी) याच्यावर जी केस केलेली आहे ती जर तुम्ही मागे घेतली नाही तर मी तुला व तुझ्या घरच्यांना जीवंत मारून टाकीन अशी धमकी दिली. त्याने कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून किरणवर वार करून जखमी केले. किरण जमिनीवर पडल्यानंतर मीरा शिंदे व तिच्यासोबत दोन महिला तेथे आल्या व त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. किरण व त्यांच्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर मारहाण करणारे घटनास्थळावरून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Post a Comment