किरण काळे यांनी वाहतूक निरीक्षकांना धरले धारेवर ; शहर काँग्रेस, खा. लंकेंच्या कार्यकर्त्यांचे मदत कार्य
माय नगर वेब टीम
अहमदनगर : नगर शहरातील पुणे एसटी स्टँडवर एका ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध पुरुषाला महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस खाली चिरडले गेले. यातून अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत सदर इसमाला झाली आहे. या घटनेची माहिती नागरिकां मार्फत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांसह ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खा. डॉ. निलेश लंके यांना देखील नागरिकांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी देखील या प्रकरणी मदतीच्या सूचना केल्या. कार्यकर्त्यांनी सदर अपघातग्रस्ताला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवत मदत कार्य केले. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत परिवहन विभागाचे वाहतूक वाहक निरीक्षक बाबासाहेब भालेराव, वाहतूक नियंत्रक बाबासाहेब शिंदे यांना किरण काळे यांनी चांगलेच धारेवर धरले.
घडले असं की, शनिवारी दुपारच्या सुमारास पारनेर तालुक्यातील एक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक पुणे स्टॅन्ड येथे प्रवासा निमित्ताने होते. मात्र एसटी चालकाच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप किरण काळे यांनी यावेळी केला. घटनास्थळा वरती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी देखील घडलेला प्रकार काळे यांना सांगितला. यावेळी घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी चित्रित केला होता. त्यामध्ये सदर नागरिकाच्या पायावरून पूर्ण बस गेल्यामुळे अक्षरशः मांसल भाग गळून पडून हाडांचा सांगाडा दिसत होता. ते पाहिल्यानंतर मात्र काळे यांचा पारा चांगलाच चढला.
तब्बल अर्धा ते पाऊण तास मदत नाही :
यावेळी नागरिकांनी काळे यांना माहिती दिल्यानंतर काळे यांनी आरोप केला की तब्बल अर्धा ते पाऊण तास सदर गंभीर अपघात होऊन देखील संबंधित वाहन चालक, एसटी स्टँड वरील नियंत्रक, निरीक्षक यांनी कोणतेही वैद्यकीय मदतकार्य अपघातग्रस्ताला केले नाही. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली नाही. हा अपघात नसून हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आहे.
अपघातग्रस्तला नुकसान भरपाई द्या :
किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने वाहतूक निरीक्षक बाबासाहेब भालेराव, नियंत्रक बाबासाहेब शिंदे यांच्याकडे अपघातग्रस्त ज्येष्ठ नागरिकाला ठोस आर्थिक मदत देण्याची मागणी केली. काळे म्हणाले की, आम्ही रुग्णालयात जाऊन उपचार करणाऱ्या संबंधितांशी चर्चा केली आहे. ही घटना एवढी गंभीर स्वरूपाची आहे की मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मोठ्या काळासाठी पेशंटची नाडी लागत नव्हती. पेशंटच्या जीविताला धोका आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या पेशंटला पैशांअभावी उपचार न मिळाल्यास हा देखील अन्याय होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तातडीने जास्तीत जास्त मदत एसटी प्रशासनाच्या वतीने करावी. हलगर्जीपणा करणाऱ्या वाहकावर कठोर कारवाई करावी. गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, किशोर कोतकर, सामाजिक न्याय विभाग युवा आघाडी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, काँग्रेस शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, संतोष हांडे, रवी धनवटे आदींनी मदत कार्या साठी धावपळ केली.
Post a Comment