नगर शहरासह जिल्ह्याच्या विधानसभा आढाव्यासाठी काँग्रेसची बैठक ; काय म्हणाले जिल्हाध्यक्ष वाघ, काळे...




जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची माहिती

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जोरदार कंबर कसून तयारी चालविली आहे. मराठवाडा, विदर्भाच्या झंझावाती दौऱ्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा काँग्रेसने नेते घेणार आहेत. शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी स. ११.३० ते दु. १ या वेळेत नगर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसह नाशिक शहर व ग्रामीण, मालेगाव शहर यांचा एकत्रित आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. 


लवकरच राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारी बाबत आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पडवी यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा जिल्हा निहाय आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना जयंत वाघ व किरण काळे म्हणाले की, जिल्ह्यात एकूण सात जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर शहरासह कोपरगाव, अकोला, श्रीगोंदा या चार अतिरिक्त मतदारसंघांची मागणी काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये केली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसने जोरदार दावा केलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महासंकल्प मेळावा पार पडला होता. काँग्रेसने यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. स्वतः थोरात यांनी यावेळी जास्तीत जास्त जागा काँग्रेस विधानसभे करिता आघाडीच्या जागा वाटपात मिळवेल असे, वक्तव्य केले होते. 

त्यानंतर आता काँग्रेसने नाशिकमध्ये विधानसभेच्या पूर्वतयारीचा आढावा आणि रणनीती करिता प्रमुख पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बोलविली आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, विविध फ्रंटल, सेल, आघाड्यांचे प्रमुख, ब्लॉक काँग्रेस पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी प्रतिनिधी आदींची यावेळी उपस्थिती राहणार असल्याचे वाघ व काळे यांनी म्हटले आहे. 

थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस बळकट :

माजी मंत्री आ.थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरासह जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटना अत्यंत बळकट आहे. दक्षिणेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तर उत्तरेत शिवसेना उबाठाचा खासदार निवडून आणण्यासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीमध्ये खांद्याला खांदा लावून जीवाचे रान केले. आता विधानसभेचा गड देखील आम्ही जनतेच्या पाठिंब्यांने उत्तमरित्या सर करू असा विश्वास वाघ, काळे यांनी व्यक्त केला आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post