माय नगर वेब टीम
अहमदनगर - शेत जमिनीच्या वादातून भावाचा खून करणार्या आरोपी भावाला येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांनी भादंवि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप, पाच हजार रूपये दंड व दंडाची रक्कम फिर्यादीस देण्यात यावी, अशी शिक्षा ठोठावली आहे. दिनकर आण्णाजी गव्हाणे (वय 65 रा. अल्हणवाडी, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले.
शहाबाई मधुकर गव्हाणे व त्यांचे पती मधुकर आण्णा गव्हाणे हे अल्हणवाडी येथे शेतात राहत होते. त्यांच्या शेताजवळच दिनकर आण्णाजी गव्हाणे हा त्याच्या कुटूंबियांसोबत राहत होता. दिनकर व मधुकर या दोघा भावात शेती जमिनीवरून भांडण होत होती. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता शहाबाई व पती मधुकर हे शेतात जात असताना दिनकर व त्याचा पुतण्या संतोष माणिक गव्हाणे हे रावसाहेब गव्हाणे यांच्या घराजवळ हातात खोरे व दगड घेवून आले. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी मधुकर यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी मधुकर यांना प्रथम पाथर्डी येथील सरकारी रूग्णालयात व पुढील उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, दुसर्या दिवशी 3 नोव्हेंबर रोजी मधुकर यांचा मुलगा जळगाव येथून आल्याने त्यांनी मधुकर यांना सुरूवातीला नगरमधील खासगी रूग्णालयात व नंतर जवळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 12 नोव्हेंबर रोजी मधुकर यांच्या पत्नी शहाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात सुरूवातीला खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर 2022 रोजी मधुकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आरोपींविरूध्द वाढीव कलम 302 लावण्यात आले. आरोपीला अटक करून सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक पी. बी. पाटील यांनी करून आरोपींविरूध्द दोषारोपपत्र येथील जिल्हा न्यायालयात पाठविले.
सदर खटल्यात सरकारच्या वतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी शहाबाई मधुकर गव्हाणे व रावसाहेब गव्हाणे यांची महत्त्वाची साक्ष नोंदविण्यात आली. परंतू दोन्हीही साक्षीदार फितूर झाल्याने आरोपी नं.2 संतोष गव्हाणे याच्याविरूध्द पुरेसा पुरावा नसल्याने त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. सदरच्या खटल्यामध्ये डॉ. मनिषा हांडे, डॉ. स्नेहल दुग्गड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार महेश जोशी व अरविंद भिंगारदिवे यांनी सरकारी वकील यांना खटल्याचे कामकाजाचे वेळी सहाय्य केले.
Post a Comment