माय नगर वेब टीम
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी (१२ ऑगस्ट) नगर शहरात येत आहेत. केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत होणार आहे. तेथून माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात येणार आहे. शहरात सुमारे साडेसहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे. दरम्यान, सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत.
जरांगे पाटील पुण्याहून नगरकडे येणार आहेत. नगरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल. रेल्वे उड्डाणपुलाजवळ नेमाने इस्टेटच्या मैदानावर वाहने लावून रॅली शहरात प्रवेश करेल. शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चौपाटी कारंजा येथे रॅलीची सांगता होईल.
नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी पाणी व फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांना सेवा, सुविधा पुरवायची आहे, त्यांनी रॅली मार्गावर पुरवावी, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटका मार्केट भरणारी जागा, शहरात क्लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज, सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यासह अनेक ठिकाणी शहरात येणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागांवर पार्किंग करण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
असा आहे शहरातील रॅली मार्ग
केडगाव येथे स्वागत - कायनेटिक चौक - सक्कर चौक - माळीवाडा बसस्थानक - मार्केट यार्ड चौक - माळीवाडा वेस - पंचपीर चावडी - आशा टॉकीज चौक - माणिक चौक - कापड बाजार - तेलिखुंट - चितळे रोड मार्गे - चौपाटी कारंजा (समारोप)
Post a Comment