नगर शहर विधानसभा मतदासंघावर काँग्रेसचा डोळा; कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी दिले महत्वाचे आदेश



बूथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करण्याच्या शहर जिल्हा काँग्रेसला सूचना 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आणि ताकद आहे. खा. राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत.  शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करा. शहरातून निवडणुकीसाठी काँग्रेस कडून जोरदार तयारी करा, असा आदेश काँग्रेसच्या प्रदेश श्रेष्ठींनी शहरातील कार्यकर्त्यांना दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी बाबत आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पडवी यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे नगर शहर विधानसभेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी शहरातील कार्यकर्त्यांना जोरदार तयारीच्या सूचना केल्या. 

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेमुळे काँग्रेस नगर शहरातली कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी पासून काँग्रेस कडे असणाऱ्या संगमनेर, श्रीरामपूर, राहत्यासह नव्याने नगर शहरासह अन्य तीन अशा एकूण सात जागांची कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला घेऊ अशी ग्वाही नगर शहरात शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी मागील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिली होती. 

सत्तेच्या संधीचे समान वाटप व्हावे : 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे यांनी नगर शहरातून किरण काळे यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली. काळे मागील पाच वर्षांपासून शहराला भयमुक्त करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. शहर विकासाचे व्हिजन घेऊन काँग्रेसला बळकट करत निर्भीडपणे काम करीत आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काळे हे जनतेच्या मनातील सक्षम उमेदवार आहेत. लोकसभेला उत्तरेत शिवसेना उबाठा तर दक्षिणेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिवाचे रान केले. थोरात हे या दोन्ही विजयांचे किंगमेकर आहेत. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना लोकसभेला संधी मिळाली आहे. दक्षिणेत काँग्रेस एकही जागा लढत नाही. नगर शहरात काँग्रेसने विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. आगामी काळात मनपावर देखील काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. लोकसभेला दोन्ही जागा सोडत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखविला. प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म बजावला. त्याग केला. आता शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवावा. सत्तेच्या संधीचे समान वाटप झाले पाहिजे. त्यामुळे नगर शहर विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसनेच लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर जोरदार आग्रह धरला. 

काळजी करू नका, अन्याय होऊ देणार नाही : 

यावेळी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करत श्रेष्ठींनी शहराची राजकीय स्थिती जाणून घेतली. किरण काळे यांचे काम चांगले आहे. संकट काळात त्यांनी नगरमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. काळजी करू नका. शहरावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी पक्ष श्रेष्ठींनी दिल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे. 

काळेंनी सत्कार केला चेन्नीथलांचा, त्यांनी केला थोरातांचा : 

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सेंट्रल  वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना संधी दिल्याबद्दल नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथलांचा सत्कार केला. यावेळी काळे यांनी चेन्नीथला यांना घातलेला गुलाबाचा हार त्यांनी थोरातांच्या गळ्यात घालत सन्मान केला. यावेळी चेन्नीथलांचा या कृतीचे कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत आभार मानले. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post