तलाठी पदाची नियुक्ती पत्र देवून आरोप करणार्यांना चपरक दिली: ना. विखे पाटील



पारदर्शी कारभार करून सरकारची प्रतिमा जपा! / जिल्हयातील १८९ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान

माय नगर वेब टीम 

 अहमदनगर : तलाठी भरती प्रक्रीयेवरून महसूल विभागाला आणि महायुती सरकारला बदनामी करणार्याना पारदर्शी भरती प्रकरीयेतून  यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देवून चपराक दिली असल्याचा टोला महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.


  जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार भवन सभागृहात महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महसूल पंधरवाड्यानिमित्त जिल्ह्यात 189 नवनियुक्त तलाठी यांना आज महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            महसूल मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, नवनियुक्त तलाठ्यांनी महसूल विभागात काम करतांना शासनाची प्रतिमा उंचावेल असे काम करावे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवावा. जनतेला तात्काळ व विनाविलंब सेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करावे. असे त्यांनी सांगितले.

            आमचे शासन गतिमान शासन असून सर्व सामान्यांचे आहे. लोकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन मिळाल्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. महसूल विभागात जमिनीच्या मोजण्या रोअर मशिन प्रणालीमुळे जलदगतीने होत आहेत. मोजणीनंतर ऑनलाईन पध्दतीने नागरीकांना उतारा उपलब्ध होत आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला असून जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध झाली आहे. या डिजीटल युगात नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने महसूल विभाग काम करत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात सेतू केंद्राच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना सर्व दाखले उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.

            मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून आतापर्यंत 7 लाख अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली असून जवळपास 1 लाख 50 हजार अर्ज मंजूर झाले आहेत. शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना आदी योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले, महसूल पंधरवाड्यानिमित्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध कामे जलद गतीने होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ गावपातळीपर्यंत पोहचवावा यासाठी गावागावात शिबिरांचे आयोजन करावे. असे त्यांनी सांगितले. पद्मश्री पोपटराव पवार आपल्या मनोगतात म्हणाले, शासनाने राज्यात तलाठी भरतीचा चांगला निर्णय घेतला असून यामुळे नागरीकांचे विविध कामे वेळेत पूर्ण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यावेळी म्हणाले, महसूल विभागामार्फत जिल्ह्यात जीएम सेवा दूत या ऑनलाईन प्रणालीमार्फत विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांचा नागरीकांनी लाभ घ्यावा. तसेच जीएम जलदूत या ऑनलाईन प्रणालीतुन टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेमध्ये टँकर मंजूरीपासून ते टँकरच्या शेवटच्या फेरीपर्यंत पारदर्शक पध्दतीने पाणी पुरवठ्याचे काम होणार आहे. यामुळे यातील गैरप्रकार बंद होतील. असे ते म्हणाले.

            पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते, कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात 5 नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्त आदेश प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते जीएम सेवादूत व जीएम जलदूत या प्रणालीचे लोकार्पण व महसूल विभागाच्या विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी महसूल पंधरवाड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. उर्वरित 184 नवनियुक्त तलाठ्यांना कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळी नियुक्ती पत्राचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले.

            कार्यक्रमात ई-हक्क प्रणाली ई-रेकॉर्ड प्रणालीबाबत सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नवनियुक्त तलाठी, त्यांचे कुटुंबिय, नागरीक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आभार व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post