माय नगर वेब टीम
अहमदनगर - व्यापार्याकडून खरेदी केलेल्या कांद्याचे 43 लाख 99 हजार 754 रूपये न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 41 रा. संदीपनगर, सारसनगर) असे फसवणूक झालेल्या कांदा व्यापार्याचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (1 ऑगस्ट) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद कदिर ऊर्फ चिन्नु सेठ, नुर मोहम्मद, मोहम्मद रिहान (सर्व रा. लखनऊ, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा परप्रांतीय व्यापार्यांची नावे आहेत. चिपाडे यांचा येथील मार्केटयार्डमध्ये कांदा आडतदाराचा व्यवसाय आहे. त्यांची नुर मो. कदिर अँड कंपनीच्या वरील तिघांसोबत ओळख झाली होती. ते तिघे चिपाडे यांच्याकडे आले होते. चिपाडे व त्यांच्यात कांदा खरेदी विषयी बोलणे झाले होते. त्यानुसार चिपाडे यांनी त्यांना कांदा पाठविण्यास सुरूवात केली. 11 जानेवारी 2022 पासून सात ते आठ महिने पाठविलेल्या कांद्याचे पैसे देखील चिपाडे यांना मिळाले होते. दरम्यान, त्यानंतर चिपाडे यांनी पाठविल्या दोन कोटी 39 लाख दोन हजार 574 रूपये कांद्याच्या रक्कमेपैकी एक कोटी 95 लाख दोन हजार 820 रूपये त्या तिघांनी चिपाडे यांना दिले होते. उर्वरित 43 लाख 99 हजार 754 रूपये दिले नाही. वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. पैसे मागितले असता चिपाडे यांना शिवीगाळ करून संपवुन टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Post a Comment