लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा!

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. १ जुलैपासून ही योजना सुरू झाली असून सव्वालाख पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसंच, ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचीही संख्या वाढत जातेय. त्यामुळे ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते यवतमाळ येथे आयोजित केलेल्या महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मेळाव्यात बोलत होते.


“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  दरमहिना १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना घोषित केली तेव्हा विरोधकांनी विधानसभेत खूप टीका केली. कोणी म्हणालं ही फसवी योजना आहे, कोणी म्हणालं १० टक्के महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, कोणी म्हणालं की महिलांना लाच देता का, महिलांना विकत घेता का, बहिणींनो या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असतं हे माहिती नाही. प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला तरी प्रेम विकत घेता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे. आमच्या बहि‍णींचं प्रेम अनमोल आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


“आपल्या बहि‍णींचं इतकं निखळ प्रेम मिळतं तर त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना की १० टक्के लोकांनाही फायदा मिळणार नाही आणि आता दीड कोटी बहि‍णींना याचा पैसा जातोय. तीन हजार रुपये सव्वाकोटी खात्यात गेले आहेत. उर्वरित खात्यातही पैसे जायला सुरुवात झाली आहे. कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, ३१ ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. कोणाही बहिणीला वंचित ठेवणार नाही”, असंही ते म्हणाले.


“सप्टेंबरमध्येही फॉर्म घेऊ, जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. पण काही लोक योजना बंद करण्याच्या मागे लागले आहेत. काही लोक हायकोर्टापर्यंत गेलेत. हायकोर्टाने चपराक केली, ते थांबवू शकले नाही. मग रोज नवनवीन गोष्टी बोलतात. योजना बंद करण्याचा प्रयत्न करतात”, अशी टीकाही त्यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post