अण्णाभाऊंचे साहित्य परिवर्तनाला चालना देणारे : खा. नीलेश लंके यांचे प्रतिपादन

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर : अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरल्याचे नमुद करतानाच महाराष्ट्राच्या जडण घडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले. 

      नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. लंके यांनी साठे यांच्या कार्याला उजाळा दिला.खा. बजरंग सोनवणे, अनिल गंधाक्ते आदी यावेळी उपस्थित होते.  

      यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रूजविण्याचे काम अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले. साठे यांच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोक कथात्मक कथा शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये साठे यांनी आपल्या समुदायाला पूर्ण भुकमारीपासून वाचविण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटीश शासनाच्या विरूध्द विद्रोह करणा-या नायक फकीराला चित्रीत केल्याचे खा. लंके म्हणाले. मुंबईमधील शहीर पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणिय प्रभाव टाकला. त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणीकामगार या दोन गाण्यांमधून दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान आणि अन्यायपुर्ण असे नमुद केले असल्याचे लंके यांनी सांगितले. 

      लंके पुढे म्हणाले, अण्णाभाऊंनी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जाती व्यवस्था आणि  गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र अवघ्या दिड दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिल्याचे खा. लंके म्हणाले.  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post