माय नगर वेब टीम
पारनेर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील हजारो भगिनींनी सोमवारी खासदार नीलेश लंके यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचे साकडे घातले. दरम्यान, राळेगणसिद्धी येथे सलग सहाव्या वर्षी खासदार नीलेश लंके, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत सामूहिक रक्षाबंधन साजरी करण्यात आले.
तिसऱ्या सोमवारची औचित्य साधून हंगे येथे श्री हंगेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. सकाळी दर्शनासाठी आलेल्या भगिनींनी खा. लंके यांच्या घरी जात त्यांना राख्या बांधल्या. त्यानंतर सोबलवाडी येथे झालेल्या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांनीही खासदार लंके यांना राख्या बांधून शुभेच्छा दिल्या.
राळेगण सिद्धी येथे रक्षाबंधनाच्या निमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सचिन पठारे, कारभारी पोटघन, संदीप शिंदे, सुभाष पठारे, किसन मापारी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री. भैरवनाथ मंदिरात सामूहिक रक्षाबंधनाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार नीलेश लंके हे आमदार म्हणून विधानसभेत जाण्यापुर्वीपासून राळेगणसिद्धी येथील रक्षाबंधनास उपस्थित राहतात. यंदाही या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी भगिनींशी संवाद साधला. उपस्थित महिलांनी खा. लंके यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की मतदारसंघातील माझ्या सर्व भगिनींचे रक्षण करणे हे भाऊ म्हणून माझे कर्तव्य आहे. सहा वर्षापासून मी दरवर्षी राळेगणसिद्धी येथील रक्षाबंधनास हजेरी लावतो. भगिनींनी प्रेमाने राखी बांधल्यानंतर मिळालेली ऊर्जा वर्षभर पुरते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मतदार संघाचा विकास करण्याचे आपले धोरण आहे. त्यांच्याच साडेचार वर्ष विधानसभेत आमदार म्हणून काम करताना हजारे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन आपण मतदार संघात ठसा उमटविल्याचे खा. लंके म्हणाले.
Post a Comment