अण्णांच्या आचासंहितेनुसार पारनेरची पत्रकारीता! ; खासदार नीलेश लंके यांचे गौरवोद्गार



राळेगणसिद्धीत खा. लंके यांचा सत्कार/ पत्रकारांचा स्नेह मेळावा व गुणवंतांचा गौरव / अण्णा हजारे यांची उपस्थिती 

माय नगर वेब टीम 

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रत्येक आंदोलनांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या पारनेर तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनी पत्रकारितेच्या धर्माला डाग लागू दिला नसल्याचे सांगतानाच अण्णांच्या आचारसंहितेनुसार पारनेरचे पत्रकार आपली पत्रकारिता करतात असे गौरवौद्गार खा. नीलेश लंके यांनी काढले. 

     पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने खा. नीलेश लंके यांची लोकसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. या निमित्ताने पत्रकारांचा कौटूंबिक स्नेह मेळावा तसेच पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा अण्णा हजारे व खा. नीलेश लंके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी खा. लंके हे बोलत होते. 

  दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांच्या सर्व पाल्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांनी तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.आता राज्याचे, आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचे ध्येय ठेवावे असे आवाहन हजारे यांनी केले.

      खा.लंके म्हणाले, राजकारण करताना पत्रकारांपासून घाबरून रहावे लागते मात्र पारनेरच्या पत्रकारांची मला भिती वाटत नाही कारण आम्ही सर्वजण एका कुटुंबातील आहोत. पारनेरचेे पत्रकार चांगल्या,वाईट गोष्टींवर प्रकाश झोत टाकतात, अन्यायाविरोधात कोणाचीही भिड भाड न ठेवता सामोरे जातात हेच पारनेरच्या पत्रकारितेचे वेगळेपण आहे. 

     पत्रकारांप्रमाणेच आपणही अण्णांचे विचार डोळयापुढे ठेऊन काम करतो. जिल्ह्याबाहेर गेल्यानंतर अण्णांच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून माझाही ऊर भरून येतो. अण्णांच्या तालुक्यातील म्हणून मलाही आचारसंहितेचे पालन करावे लागते. अण्णांच्या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतो. कोठेही गेलो तरी अण्णांचा धाक पाठीशी असतो असे खा. लंके म्हणाले.

      यावेळी यावेळी राळेगणसिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी, ॲड. राहुल झावरे,

 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, मार्तंडराव बुचुडे, मिरजगांवचे सरपंच राम कानवडे,डॉ. बाळासाहेब कावरे, शिवाजीशेठ लंके, सतीश गंधाक्ते, दत्ता आवारी, रायभान औटी,अ‍ॅड.गणेश कावरे यांच्यासह पत्रकार, त्यांचे कुटूंबिय, पाल्य आदी उपस्थित होते.

      खासदार लंके म्हणाले की,पत्रकारांच्या पाल्यांच्या गौरवाचा कार्यक्रम अण्णांच्या हस्ते होतोय हे या मुलांचे भाग्य आहे. कोणतीही गोष्ट एकाएकी होत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है या प्रमाणे त्याग केला तर प्रत्येक क्षेत्रात यश दुर नाही असा संदेश खा लंके यांनी दिला.

      कोणत्याही पदावर गेले तरी समाजाची बांधिलकी जपा. गोरगरीबांना न्याय द्या. माणसांमध्येच परमेश्‍वर आहे, त्यांची सेवा करा असा कानमंत्र देतानाच पत्रकारांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या उत्तुंग यशचा संपूर्ण तालुक्याला अभिमान असल्याचे खा. लंके म्हणाले.    

 प्रा. तुषार ठुबे यांनी सुत्रसंचलन केले. संघाचे माजी अध्यक्ष  देवीदास आबूज यांनी अध्यक्षीय सूचना,सुरेंद्र शिंदे यांनी अनुमोदन, उदय शेरकर यांनी स्वागत, विनोद गोळे यांनी प्रास्ताविक तर शरद झावरे यांनी आभार मानले. 

अण्णांच्या आदर्शावर काम सुरू केले

लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला लोकसभेत पाठविले. संसदेत गेल्यानंतर जमेल का अशी शंका वाटत होती. मात्र कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे मनात ठेऊन तसेच ज्या अण्णांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीला हलविले याचा आदर्श डोळयापुढे ठेऊन काम सुरू केले. संसदेत इंग्रजीत शपथ घेतली. शेतकऱ्यांचे, गोरगरीबांच्या घरकुलांचे प्रश्‍न मांडल्याचे खा. लंके म्हणाले. 

अण्णांच्या विचारांवर काम करतो, म्हणून मी संसदेत

अण्णांच्या विचारांवर मी शंभर टक्के काम करू शकत नसलो तरी जास्तीत जास्त त्यांच्याच विचारांवर काम करतो म्हणून मला जनतेने विधानसभेत,लोकसभेत पाठविले. विधानसभेत काम करताना साडेचार वर्षात जे जे करता येईल ते केले. लोकसभेतही मी जनतेच्या हितासाठी काम करणार असून सत्ता ही प्रतिष्ठेसाठी नाही तर जनतेसाठी असते या भूमिकेतूुन काम करणारा मी असल्याचे लंके म्हणाले. 

पत्रकार आणि खासदार असे अंतर नाही !

चांगले काम करणारांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहतो. मी कोणत्याही पदावर नसताना पत्रकारांशी माझे जिव्हाळयाचे संबंध होते. आजही तसेच आहेत. लोकसभा निवडणूकीत माझे कोणाशी बोलणेही झाले नाही तरीही पत्रकारांनी कुटूंबातील सदस्य संसदेत जातोय म्हणून सहकार्याची भावना ठेवली. आज मी खासदार असलो तरी पत्रकार व खासदार असे अंतर कधीही राहणार नाही कारण आम्ही एकाच कुटूंबातील आहोत. 

खा. नीलेश लंके 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post