जलसंपदा विभागाची मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करा ; खासदार नीलेश लंके यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र




माय नगर वेब टीम 

अहमदनगर : नगर दक्षिण मतदारसंघातील जलसंपदा विभागातील कामासबंधी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री तथा  जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. 

        नगर लोकसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या अनुषंगाने काही समस्या तसेच कामकाजासंबंधी फडणवीस तसेच आपल्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती खा. लंके यांनी केली आहे. 

        कुकडी डावा कालवा किमी २६ ते १६५ मजबुतीकरण करणे, पिंपळगांव जोगा डावा कालवा गळती प्रतिबंधक कामे करणे, शेवटच्या भागातील अस्तरीकरण करणे, वडझिरे ते शिवडोह लिंक कॅनलच्या कामामधील अडथळे दुर करणे, चाऱ्यांची अपूर्ण कामे पुर्ण करणे, पाझर तलाव व बंधाऱ्यांनी दुरूस्ती करणे, पाणी वापर संस्था सक्षमीकरण करणे व अनुदान देणे, पिंपळगांव जोगा धरणात पुर्ण क्षमतेने पाणी साठा करणे, डिंभे ते माणिकडोह धरणापर्यंत बोगद्याच्या  कामामधील अडथळे दुर करून कामास मान्यता देणे, कोकण  विकास महामंडळाकडून पाणी उपलब्धतेबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत कार्यवाही करणे, राळेगणसिध्दी व इतर ९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मान्यता देणे, साकळाई उपसा सिंचन योजना, कर्जत-जामखेड उपसा सिंच योजना,  म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना आदींबाबत चर्चा करणे, निर्णय घेणे व निधी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीचे जलसंपदा विभागाकडून आयोजन करण्यात यावे अशी विनंती खा. लंके यांनी या पत्राद्वारे फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

     या बैठकीस आपल्यासह विधानसभा  सदस्य अतुल बेनके, बबनराव पाचपुते, रोहित पवार, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, पुणे येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व अन्य संबंधित मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी यांना निमंत्रीत करण्यात येऊन या बैठकीचे लवकरात लवकर आयोजन करण्यात यावे अशी विनंती खा. लंके यांनी पत्राद्वारे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post