लढवायची नव्हती मात्र खेटाखेटीत लोकसभा लढलो!; खा. नीलेश लंके यांची तुफान बॅटींग




जवळे येथे विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण

माय नगर वेब टीम 

पारनेर : मला लोकसभेची निवडणूक लढवायचीच नव्हती. ही निवडणूक खेटाखेटीत झाली. मला कोणी खेटलं तर जमत नाही हे जगाला माहीती आहे. विधानसभेत मी आनंदी होतो. असे सांगतानाच लोकसभेची जबाबदारी आल्यावर आपण काम करून दाखविणार असून पाच वर्षात निष्क्रिय नव्हे तर राज्यात कामाचा ठसा उमटविणार आहोत असा विश्‍वास खा नीलेश लंके यांनी व्यक्त केला. 

     जवळे येथील विविध विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण खा. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण करीत विरोधकांवर शरसंधान साधले. यावेळी बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, सरपंच जयसिंग मापारी, किसनराव रासकर, भाऊसाहेब आढाव, प्रदीप सोमवंशी, बाळासाहेब सालके, संदीप सालके, सुभाष आढाव, सुवर्णा धाडगे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस ढोल ताशांच्या गजराज खा. लंके यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

           खा. लंके म्हणाले, माझ्या विजयानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर निघोजमधील एकाने माझी खासदारकी जाणार अशी पोष्ट केली. मात्र मी समोरच्याची जिरवली ना ? न्यायालयात जरी काही झाले आणि निवडणूक झाली तरी पुन्हा दोन-तीन लाखांनी पराभव करेल असा टोला लंके यांनी लगावला.  न्यायालयाचा काय निकाल लागणार आहे  असा सवाल करीत मी अनुभवलेला कोव्हीड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते निवडणूकीपूर्वी एक महिना करण्यात आले. ती पुस्तके पन्नास रूपये देऊन गोळा करण्यात आली. मला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे.त्यांना कोर्ट कचेरीसाठी वेळ दिला आहे. त्यांना पराभव मान्य नाही अशी घणाघाती टीका लंके यांनी केली.

मी मागणी केली आणि अजितदादांनी घोषणा केली !

दुध भेसळ करणारांवर कारवाईची मागणी आपण संसदेत केली. आपल्या भाषणानंतर अजितदादा पवार यांनी दुसऱ्या दिवशी दुध भेसळ करणारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची घोषणा केली. आपल्या मागणीची दखल राज्यात घेतली गेल्याचे खा. लंके म्हणाले. 

आपले सरकार आल्यावर बोगद्याचा प्रश्‍न मार्गी लावू

डिंबे ते माणिकडोह बोगद्यासाठी मी देवेेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेले आहे. आज जरी काम झाले नाही तरी आपले सरकार आल्यानंतर हे काम मी मार्गी लावणार आहे. कारण हा आपल्या जिव्हाळयाचा प्रश्‍न आहे असे लंके म्हणाले.

लोकांच्या नावावर जमीनी करून देण्याचा मंत्र्यांना अधिकार आहे का ? 

पठारवाडीतील गायरान हडपण्याचा काही लोकांचा डाव आहे. त्यामागे कोण आहे ? त्याला आशिर्वाद कोणाचा आहे हे सर्वांना माहीती आहे. या प्रश्‍नावर पठारवाडीकरांनी एकसंघ रहावे. मी तुमच्या पाठीशी आहे. गावाच्या जमीनी कोणी बळकावत असेल तर त्यास विरोध करणे हे आमचे काम आहे. मग बळकावणारा कोणत्याही विचारांचा असो. सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. याच प्रश्‍नावरून पठारवाडीच्या ग्रामस्थांना दमदाटी केली जाते. या प्रश्‍नावर संपूर्ण ताकद देण्याची माझी तयारी आहे. कोणी अधिकारी ऐकत नसेल तर आपण त्यांच्या दारात जाउन बसू. लोकांच्या नावावर जमीनी करून देण्याचा मंत्रयांना अधिकार आहे काय  असा सवाल लंके यांनी केला. 

जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी यंत्रणा हाताळली 

लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी गेलो त्यावेळी अनामत रक्कम भरण्यासाठी माझ्या खिशात एक रूपयाही नव्हता. काय करावे हा प्रश्‍न निर्माण झाला आणि शेजारी असलेल्या वकीलाने सांगितले की, सकाळीच पानोली येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूकीप्रमाणेच लोकसभेच्या निवडणूकीची अनामत रक्कम सकाळीच आणून दिल्याचे सांगितले. माझी निवडणूक कशी झाली हे मला कळलेही नाही. माझ्या जीवा भावाच्या सहकाऱ्यांनी सर्व यंत्रणा हातळली हीच माझी संपत्ती असल्याचे सांगत माझ्या हातातील घडयाळावर टीका करणारांनी संध्याकाळचे वांधे आहे हे पहावे असा टोला खा. लंके यांनी लगावला.  

त्यांनी पारनेरची काळजी करू नये 

विरोधकांनी माझ्या पारनेर-नगर मतदारसंघाची काळजी करू नये. त्यांनी बुक्का तयार ठेवावा. खासदारकी जिंकली आता तुम्ही असल्यावर काय काळजी आहे. लोकसभेला तालुक्यातील निम्मी यंत्रणा बाहेरच्या तालुक्यात होती. तरीही गावागावांमध्ये आपल्याला आघाडी आहे. ती यंत्रणा आता इथेच आहे. पारनेरचा विषय सोडून द्या आपल्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. जिल्हयातून सर्व आमदार निवडूण आणण्याचा शब्द शरद पवार, उध्दव ठाकरे यांना  दिला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे घटक आहेत. उमेदवारी ठरविण्यासाठी आघाडीचे नेतृत्व सक्षम आहे. त्यांचा जो निर्णय होईल त्याला आपण सहमत राहू असे खा लंके म्हणाले. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post