आपल्या पाठपुराव्यानंतर मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी : विखे पिता पुत्रांवर खा. नीलेश लंके यांचे शरसंधान

 



जिल्हाधिकारी कार्यालयातील विखे यांच्या बैठकीचा केवळ फार्स 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर :   नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आपण दि.२२ जुन रोजी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी ८४ लाख ७९ हजार ७५१ रूपये इतका निधी मंजुर झाला आहे. गडकरी यांची घेतलेली भेट, त्यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, मंत्री गडकरी यांच्या मंत्रालयाकडून मंजुर झालेल्या निधीचे पत्र, पूर्वीच्या ठेकेदारास काळया यादीत टाकल्याचा आदेश आदी पत्रकार परिषदेत सादर करीत खासदार नीलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रांवर नगर येथे जोरदार शरसंधान केले. पालकमंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या रस्त्यासाठी घेतलेली बैठक केवळ फार्स होता. या रस्त्यासाठी पाच वर्षे पाठपुरावा का केला नाही असा सवालही लंके यांनी विखे-पिता पुत्रांचे नाव न घेता केला. 

      यावेळी बोलताना लंके म्हणाले, दि.५ डिसेंबर २०२२ मध्ये आपण नगर-पाथर्डी व नगर-मनमाड या रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. दोन्ही रस्त्यांचे काम पुर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन त्यावेळी देण्यात  आले. प्रत्यक्षात पाथर्डी रस्त्याचे काम पुर्ण झाले. मनमाड रस्त्याचे मात्र अद्यापही काम झालेले नाही. खरे तर तत्कालीन खासदारांनी हे काम पूर्ण करून घेण्यासाठी लक्ष देणे अपेक्षीत होते, मात्र तसे काही झाले नाही. गेल्या सहा वर्षांपासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आला असल्याचे लंके म्हणाले. 

      दि.४ जुन रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर आपण २२ जुन रोजी दिल्लीत मंत्री नितीन गडकरी यांची खा. सुप्रिया सुळे, खा. कल्याण काळे, खा. बजरंग सोनवणे यांच्यासह भेट घेतली. गेल्या सहा वर्षांपासून हा रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्यावर आतापर्यंत ५०० ते ६०० बळी गेले असल्याचे आपण गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. या कामाच्या ठेकेदारास काळया यादीत टाकून दुसरा ठेकेदार नियुक्त करण्यासाठी वेळ जाणार असल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी आपण केली होती. त्याच वेळी गडकरी यांनी त्यांचे स्विय सहाययक बाबासाहेब ठेंगे यांना दुरूस्तीच्या कामाचा प्रस्ताव करण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या हे लंके यांनी यावेळी पुराव्यांसह दाखवून दिले. 


 रस्ता  दुरूस्तीसाठी जयहिंद एजन्सी

आपल्या मागणीनंतर मंत्री गडकरी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि.१० जुलै रोजी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी टेंडर काढण्यात आले. वाशी, नवी मुंबई येथील जयहिंद रोड बिल्डर्स या एजन्सीची रस्ता दुरूस्तीसाठी नियुक्ती करण्यात आली. या एजन्सीने काम सुरू केल्यानंतर ते निकृष्ठ असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेकेदारास दर्जेदार काम करण्यासंदर्भात तंबी देण्यात आल्याचेही खा. लंके म्हणाले. 

 जुना ठेकेदार काळया यादीत 

आपल्या मागणीनुसार मनमाड रस्त्याचे काम करणाऱ्या पूर्वीच्या ठेकेदारास दि.२३ जुलै रोजी काळया यादीत टाकण्यात आले. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी औरंगाबाद येथील एजन्सी नियुक्त करण्यात आली असून काही भागात काँक्रीटचा रस्ता घेण्यासंदर्भातही आपण मंत्री गडकरी यांना पत्र पाठविले असल्याचे लंके यांनी सांगितले.

निवडणूक डोळयापुढे ठेऊन बैठकीचा फार्स 

या रस्त्याच्या कामावरून गेल्या आठ दिवसांपासून राजकारण सुरू आहे. कृती समितीची बैठक बोलविण्यात आली यात दुमत नाही. पाठपुरावा झालाच पाहिजे मात्र केवळ प्रसिध्दीसाठी फार्स करणे योग्य नाही. इतके दिवस असा पाठपुरावा का झाला नाही ? आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिशाभुल करण्यात येत आहे. या बैठकीत जे दाखविले गेले ते पुर्णतः चुकीचे आहे. निवडणूका डोळयापुढे ठेऊन असा फार्स करणे योग्य नसल्याचा टोला खा. लंके यांनी लगावला. 

 तुम्ही अकार्यक्षम 

आम्ही काम करणारे आहोत. तुम्ही कार्यक्षम होते तर यापूर्वीच या रस्त्याचे काम का झाले नाही ? उपोषण करून जसा नगर-पाथर्डी रस्त्याचे काम आपण पुर्ण करून घेतले तसे तुमचाच रस्ता होता तो पुर्ण का करून घेतला नाही. कारण तुम्ही अकार्यक्षम होता हेच त्यातून ध्वनीत होत असल्याची टीकाही लंके यांनी केली. सहा सात वर्षात मनमाड रस्त्यासाठी त्यांच्याकडून काहीच झाले नाही. ज्याप्रमाणे पाथर्डी रस्त्याचे काम सुरू होऊन ते पुर्ण झाले तसेच मनमाड रस्त्याचेही नारळ फुटल्यानंतर ते संपेपर्यंत थांबणार नाही असा विश्‍वासही लंके यांनी व्यक्त केला. 

राजीनाम्याच्या तयारीनंतर उत्तरच नाही !

पूर्वी नगर-मनमाड रस्त्याच्या ठेकेदाराकडून खंडणी मागण्यात आल्याचा आरोप मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्याच वेळी आपण स्वतः राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यानंतर उत्तर आलेच नाही. हा रस्ता केंद्र शासनाच्या आखत्यारीत आहे. त्यामुळे त्यावेळी आपला आणि प्राजक्त तनपुरे यांचा त्याच्याशी काही संबंध येण्याचे काहीच कारण नव्हते. तो रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा असता तर त्यास आम्ही दोघे जबाबदार ठरलो असतो असे स्पष्टीकरण खा. लंके यांनी दिले. 

      पत्रकार परीषदेस अभिषेक कळमकर, प्रदीप परदेशी, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, विक्रम राठोड, अ‍ॅड. राहुल झावरे, रविंद्र राजदेव, प्रकाश पोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post