अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयातून मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम यशस्वी करावा: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



माय नगर वेब टीम 

अहमदनगर :- महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असुन या योजनेस आपल्या जिल्ह्यातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसंदर्भात येत्या 22 ऑगस्ट रोजी शिर्डी येथे राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व अधिकारी व कर्मयचाऱ्यांनी समन्वयातुन व एकत्रितपणे काम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना”कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.

  यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदी उपस्थित होते.

  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने “मुख्यमंत्री-माझी बहिण योजना”सुरु केली आहे. जिल्ह्यात या योजनेची अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली असुन 7 लाखापेक्षा अधिक महिला भिगीनींचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या भगिनींना दरमहा 1 हजार 500 रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार असुन भगिनींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये यासाठी अधिकाधिक महिलांची नोंदणी करुन त्यांना लाभ देण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी केले. 

  राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमास येता यावे यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी  गावनिहाय रूटप्लॅन, लाभार्थी वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचतील यादृष्टीने नियोजन करावे. कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्त्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी. या कार्यक्रमाची ग्रामीण स्तरापर्यंत व्यापक स्वरुपात प्रचार, प्रसिद्धी करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या

जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालणाऱ्या अनेक प्रकल्पांचा शुभारंभ व भूमीपुजनही यावेळी करण्यात येणार आहे. शिर्डी येथे औद्योगिक वसाहत, ईटी आयव्हीलॅब, शिर्डी येथील थीम पार्क, अपर जिल्हाधिकारी कार्यालय,शिर्डी अकोले येथील तहसिल कार्यालय, नवीन तलाठी कार्यालये, श्री साईबाबा शिर्डी संस्थान शैक्षणिक संकुल तसेच  शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, सावळी विहिर या उपक्रमांचा शुभारंभ व भूमीपुजन करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

  बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post